कराड : केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारची धोरणे आणि अनागोंदी कारभारामुळे गेल्या नऊ वर्षात वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, नोकर भरती व स्पर्धा परीक्षेत मोठे घोटाळे झाल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ युवक काँग्रसच्या राज्यस्तरावरील नेत्यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातून युवा आक्रोश-मशाल मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे व शहराध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चीब, सहप्रभारी एहसान खान, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रवक्ते दीपक राठोड, महासचिव श्रीनिवास नालमवार, प्रदेश सरचिटणीस तारिक बागवान आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व नागरीक बहुसंख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्य पुतळ्याला अभिवादन करुन निघालेला हा मोर्चा प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी विसावला. दरम्यान, घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून गेला होता.