पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदत, सवलतीत कर्ज द्या

शेतकरी, व्यापारी आदींसाठी फडणवीस यांच्या मुख्यमंत्र्यांकडे मागण्या

शेतकरी, व्यापारी आदींसाठी फडणवीस यांच्या मुख्यमंत्र्यांकडे मागण्या

मुंबई : पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदत व सवलतीचे कर्ज, शेतकऱ्यांना वीजबिल माफी, कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती निवारण यंत्रणा यासह तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी विविध मागण्या करणारे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सुमारे २६ ठिकाणी भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना  पत्र पाठविले आहे. पिकांच्या नुकसानीचे पैसे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत. जनावरांच्या मृत्यूंची पशुधनभरपाई तातडीने देण्यात यावी. कोकणात मासेमारांना तातडीने मदत करण्यात यावी, अशा मागण्या फडणवीस यांनी केल्या आहेत.

दुकानदारांना मदत करण्याची तरतूद नसताना २०१९च्या पुराच्या वेळी भाजप सरकारने ती प्रथम केली. या पुरात त्यांचे झालेले नुकसान पाहता दुकानदारांना मदत करण्यात यावी. मूर्तिकार, कुंभार यांच्यासाठी स्वतंत्र मदतीची योजना तयार करण्यात यावी. टपरीधारक/हातगाडीधारक अशाही घटकांचा विचार करण्यात यावा. नागरिकांना त्यांची वाहून गेलेली कागदपत्रे तयार करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. घरांच्या दुरुस्तीसाठी, बांधकामासाठी वाळू, मुरूम मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

भूगर्भ शास्त्रज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून धोकादायक गावांचे आरेखन करण्यात यावे. दरडीनजीक असलेल्या राज्यातील सर्व गावकऱ्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. पुराचे पाणी वळण बंधाऱ्यांच्या (डायव्हर्जन कॅनाल) तसेच बोगद्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागात नेण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसह अनेक उपाययोजनांची आखणी आमच्या सरकारच्या काळात करण्यात आली.  त्याला गती देण्यात यावी. कोयनानगर येथील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्या फडणवीस यांनी केल्या असून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून विचारविनिमय करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर

सांगली जिल्ह्य़ात महापुरामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान  झाले आहे. पूरस्थितीची व नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार, २ ऑगस्टला सांगली जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर जात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Provide substantial financial assistance to flood victims devendra fadnavis zws

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या