अहिल्यानगर: उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मागे जनताच राहिलेली नाही. त्यामुळे दोघे एकत्र आल्याने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. जनता महायुतीच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. विधानसभा निवडणुकीसारखेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चित्र दिसेल, अशी टीका जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, शुक्रवारी नगरमध्ये बोलताना केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी लोणी व कोपरगावच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या सभेच्या नियोजनासाठी मंत्री विखे यांच्या उपस्थितीत आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल भाजपवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री विखे म्हणाले, त्यांना आता दुसरे काही काम राहिले नाही, कोणत्या वेळी काय बोलावे याचेही भान नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी ते राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची किव वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे हे स्पष्ट केले आहे.
परंतु जे मुख्यमंत्री असताना काही करू शकले नाहीत, घरात बसले, ते दुसरे काय करणार? मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दिवाळीनंतर मंत्र्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे, त्या संदर्भात बोलताना मंत्री विखे म्हणाले, की जरांगे यांच्या मागण्यांचा सरकारला आदरच आहे. बऱ्याच वर्षांनी त्यांच्या मागण्या पहिल्या टप्प्यात कार्यान्वित झाल्या आहेत. इतर मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या मागण्या समाजासाठी आहेत. व्यक्तिगत नाहीत. सरकार त्यांच्या मागण्यांबद्दल गंभीर आहे.
मुख्यमंत्री गैरसमज दूर करतील
मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार पुढे जात आहे. ओबीसी नेत्यांच्या मनात काही गैरसमज असतील, तर ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर दूर होतील, असेही मंत्री विखे यांनी सांगितले.
मदतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती एकत्रित केली जात आहे. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा आटोपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री मदतीबद्दल निर्णय घेतील. अजूनही अनेक ठिकाणी पंचनाम्यासाठी शेतात जाता येत नाही. ही परिस्थिती येत्या पंधरा दिवसांत दूर होईल, अशी अपेक्षा असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.