लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली.
५६ वर्षांचे डॉ. प्रकाश महानवर हे सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालकपदावर कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या पूर्वीच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा कार्यकाळ गेल्या ५ मे रोजी संपल्यामुळे रिक्त झालेल्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कारभार होते. मुंबईच्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत हे पाहात होते.
आणखी वाचा-भाजपाची खेळी, राज्यातले मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
डॉ. महानवर हे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपाल तथा कुलपतींनी कानपूरच्या आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरु निवड समिती गठीत केली होती. सर विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. सुरेशकुमार (यूजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते. या समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर डॉ. महानवर यांची कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे.