आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएला महाराष्ट्रातील ४५ जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना भाजपाकडून लोकसभेचं तिकीट दिलं जाईल असं बोललं जात आहे.
राज्यातले मंत्री आणि आमदारांना भाजपा लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याच्या चर्चांवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी आत्ता लंडनला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाघनख महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यासाठी तिकडे जातोय. तिथून आल्यावर मी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटेन. त्यांनी यासंदर्भात काही सांगितलं तर मी तुम्हाला सांगतो.
दरम्यान, यावेळी मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला जर लोकसभेचं तिकीट मिळालं तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? यावर मुनगंटीवार म्हणाले, तेव्हाचं तेव्हा बघू. उद्या आम्हाला सांगितलं की राजकारण बंद करा, तर मी राजकारण बंद करेन. हा प्रश्नच येत नाही. भाजपाचा कार्यकर्ता हा अनुशासनप्रिय आहे. परंतु, तुम्ही (प्रसारमाध्यमं) आत्तापासूनच काही लोकांच्या हृदयात धडकी भरवण्याचं काम का करत आहात?
हे ही वाचा >> मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, कारण काय?
सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर, रवींद्र चव्हाण यांना ठाणे, राम सातपुते यांना सोलापूर, राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई, चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा आणि विनोद तावडे यांना मुंबईतील मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची योजना भाजपाने बनवली असल्याचं बोललं जात आहे.