जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडी चौकशीच्या रडारवर आलेले ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित रविंद्र वायकर यांचा पक्षप्रवेश वर्षा बंगल्यावर झाला. या प्रवेशाच्या आधी म्हणजेच वर्षा बंगल्यावर जाण्यापूर्वी जोगेश्वरी क्लब हाऊस या ठिकाणी त्यांनी गणपतीची पूजा केली. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारला असता ते भावूक झालेले पाहण्यास मिळाले.

उद्धव ठाकरेंची घेतली होती भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रविंद्र वायकर यांची ९ मार्च रोजी भेट झाली होती. त्यावेळी वायकर यांना शिंदे गटातील प्रवेशाविषयी विचारण्यात आले होते. मात्र अद्याप तसा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता वायकर यांनी रविवारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरेंचा प्रश्न येताच रविंद्र वायकर भावूक

९ मार्चला तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, तसंच उद्धव ठाकरे तुमच्या मतदारसंघात आले होते. तुमचे आणि त्यांचे इतक्या वर्षांचे ऋणानुबंध आहेत असं म्हटलं असता, रविंद्र वायकर म्हणाले “मी उद्धव ठाकरेंचं स्वागत करणारच ना” असं म्हणताना रविंद्र वायकर यांचे डोळे पाणावले होतं तसंच ते भावूक झाले. त्यानंतर फार काही न बोलता ते वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर तिथे त्यांचा प्रवेश झाला.

हे पण वाचा- वायकर शिंदे गटात; ‘ईडी’ कारवाईच्या भीतीने उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविंद्र वायकर यांनी काय म्हटलं आहे?

“गेली ५० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. १९८४ सालची जोगेश्वरीच्या पहिल्या दंगलीपासून मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करतोय. पडेल ते काम मी केलेले आहे. चार वेळा नगरेसवक, चार वेळा स्थायी समितीचं अध्यक्षपद, तीन वेळा आमदार झालो. मात्र मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण वेगळं आहे. करोना काळात आपली काहीही कामं झालेली नाहीत. आरेतील ४५ किलोमीटर रस्त्याच्या कामांसाठी मला १७३ कोटी रुपये हवे आहेत. लोक रडत आहेत. आमच्याकडचे रस्ते होणे गरजेचे आहे, असे लोक सांगत आहेत. अशा वेळेला लोकांसाठी धोरणात्मक निर्णय होणं हे प्रामुख्याने गरजेचं असतं. असे निर्णय बदलले नाहीत तर आपण जनतेला न्याय देऊ शकत नाही” असे वायकर म्हणाले.