मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास वाढला आहे. मोदींच्या लाटेत देशाच्या संसदेत जाण्याचा मार्ग सहज शक्य असल्याची धारणा बळावली आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणार्या भाजपा आणि महायुतीतील उमेदवारांची संख्या मोठी आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच यावर तोडगा काढावा, यासाठी शुक्रवारी दिवसभर सागर बंगल्यावर इच्छुक उमेदवारांची रांग लागली होती. एकमेकांना टाळून फडणवीसांच्या भेटीला गेलेले इच्छुक उमेदवार तिथे मात्र एकमेकांच्या समोर उघड झाले. या सर्व इच्छुकांची समजूत काढून देवेंद्र फडणवीस नेमका कोणता हुकमी तोडगा काढणार? हे दोन दिवसांत स्पष्ट होईल.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात युतीच्या माध्यमातून शिवसेना यापूर्वी लढत आली आहे. शिवसेनेची शकले झाली आणि भाजपाला धाराशिव जिल्ह्यात जास्तीचा लोकानुनय मिळाला. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला प्रतिसाद देत मतदारसंघातील मतदारांनी दोन्हीवेळा शिवसेनेला मोठे मताधिक्य दिले. यापूर्वी विजयी झालेल्या शिवसेनेच्या कल्पना नरहिरे, शिवाजी कांबळे यांना असे मताधिक्य मिळालेले नव्हते. २०१४ साली दोन लाख ३४ हजार मतांनी तर २०१९ साली एक लाख २६ हजार मतांनी शिवसेनेचा उमेदवार लोकसभेत दाखल झाला. आता पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाला जिल्ह्यातून तसाच प्रतिसाद मिळेल, या भावनेतून महायुतीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी डझनभराहून अधिक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींचे उंबरठे मागील महिनाभरापासून झिजविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी बंगल्यावर धाराशिवच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग लागली होती.
हेही वाचा – बच्चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?
हेही वाचा – लिंगायत मतपेढीचे गणित मांडत लातूरमध्ये काँग्रेसची डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी
महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. शिंदे सेनेकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत इच्छुक आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदार हे एकमेव नाव चर्चेत आहे. तर भाजपाकडून माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास कोळगे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, अॅड. व्यंकट गुंड, बसवराज मंगरूळे, अशी मोठी यादी आहे.
हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली
हेही वाचा – राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हिरमुसले !
या व्यतिरिक्त सक्षम उमेदवार म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. शुक्रवारी औशाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यावेळी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटीलही उपस्थित होते. विजय आपलाच होणार, या आत्मविश्वासातून वाढलेली इच्छुकांची संख्या आणि उमेदवारी मिळावी यासाठी लागलेली रांग यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला प्राधान्य देणार आणि कोणता हुकमी चेहरा ठाकरे सेनेच्या शिलेदारासमोर आव्हान म्हणून पुढे आणणार हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.