तीन राज्यांच्या निवडणुका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना, देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. त्यांच्या या विधानावरून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा –

शरद पवारांवर खोचक टीका

सोलापूर जिल्ह्यातील करकंब पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यानंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी पवारांवर खोचक शब्दात टीका केली. “शरद पवारांनी आता स्वप्नरंजन करणे थांबवले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्याकडेला पूर्वी जे पोपट बसत होते, त्यांची उपासमार तुम्ही का करता? भविष्य सांगणं त्यांचं काम आहे, ते काम त्यांना करू द्या, असे ते म्हणाले. तसेच देशात सध्या कोणतेही बदलाचे वारे नाहीत आणि असा बदल करण्याची जनतेचीदेखील इच्छा नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

कांद्यावरील राजकारणावरून मविआवर टीकास्र

यावेळी बोलताना त्यांनी कांद्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही प्रतिक्रिया दिली. “सरकारतर्फे नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जर राज्यात कुठे नाफेडतर्फे कांदा खरेदी होत नसेल तर त्याची चौकशी करून लगेच कार्यवाही केली जाईल. कांद्याच्या अनुदानाबाबत बोलायचं झाल्यास यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण सरकार अनुदानासंदर्भात सकारात्मक आहे”, असे ते म्हणाले. तसेच “महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्याला कोणतीही मदत झाली नव्हती. गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठी मागच्या सरकारने एक रुपयादेखील दिला नव्हता”, अशी टीकाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगर जिल्ह्याच्या नामांतरावरही दिली प्रतिक्रिया

पुढे बोलताना त्यांनी नगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीवरही प्रतिक्रिया दिली. “नगर जिल्ह्याचे नामकरण हे पुण्यशोल्क अहिल्यादेवी नगर करावे, असा प्रस्ताव आहे आणि त्याला सर्वांचाच पाठिंबा आहे. अहिल्यादेवी यांचे जन्मगाव हे नगर जिल्ह्यात आहे. त्यांचे नाव जिल्ह्याला देणे हे भूषणावहच आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल”, असे ते म्हणाले. तसेच जिल्हा विभाजनाच्याबाबतीतही अनेक प्रस्ताव आहेत. राज्यातील जे मोठे जिल्हे आहेत त्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी माहितीही त्यांनी दिली.