राहाता : बोगस आणि खोटे मतदार संबोधून त्यांच्याच तालुक्यातील मतदारांचा अपमान ते करीत आहेत. पराभव झाल्यामुळे आता चाळीस वर्षांनंतर तुम्हाला मतदार बोगस वाटायला लागले का ॽ असा प्रश्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता उपस्थित केला आहे. लोणी येथे माध्यमांशी बोलतांना विखे म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी मुदत दिली जाते. मात्र, आज आयोगावर आरोप करणारे तेव्हा झोपले होते का ॽ, पराभव झाला म्हणून थेट मतदारांनाच बोगस आणि खोटे ठरविण्याचा प्रयत्न म्हणजे एकप्रकारे त्यांचा अपमान आहे. मग तुम्हाला निवडून देतानाही बोगस मतदान होते काॽ कोणत्याही निवडणुकीचा निकाल खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे. निळवंडे धरणाच्या संदर्भात थोरातांनी केलेल्या टिकेला उतर देण्याची आवश्यकता नाही. जनतेनेच त्यांना विधानसभेला उत्तर दिले आहे. त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला विखे यांनी लगावला.

वसंतदादा शुगरच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास केला गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल माझे वक्तव्य नव्हते. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचा प्रश्नच नाही. तसे माझ्याकडून कधीही झालेले नाही, असे स्पष्ट करून विखे म्हणाले, अनेक वर्ष देशात कृषिमंत्री पदावर राहूनही ज्यांना सहकारी कारखानदारी बाबत कोणतेही निर्णय करता आले नाहीत, अशा जाणत्या राजांना जाणीव करून देण्यासाठी मी बोललो. कारण एकीकडे सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवायची पण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अहवालात केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्याचे मोठे मन दाखवायचे नाही. याबाबतची वस्तूस्थिती मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने व्हीएसआयच्या शिष्टमंडळाला करून दिली होती आणि तोच संदर्भ माझ्या भाषणात होता.

शरद पवार यांच्यावर टीका

सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आयकराचा बोजा कमी करण्याचा किंवा इथेनाॅल धोरणाचा निर्णय करून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्याचे मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही यासाठी मोठे सहकार्य मिळाले. अनेक वर्ष राज्यातील जाणते राजे फक्त केंद्राकडे शिष्टमंडळ घेवून जात होते, पण कोणताही निर्णय त्यांना करता आला नाही, अशी टीका विखे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.