शरद पवारांनी गर्वाने एकदा मराठा असल्याचं सांगावं. अथवा ‘एका मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा शरद पवारांनी द्यावी, असं आव्हान मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं. त्यावर बोलताना विखे-पाटलांनी हे विधान केलं आहे.
शरद पवार काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही राज्यांत ओबीसी असल्याचा दावा करत आहेत. पंतप्रधान मोदी विकासावरून जातीच्या राजकारणावर आले आहेत का? असा प्रश्न शरद पवारांना प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारला होता. त्यावर शरद पवारांनी म्हटलं, “दुर्दैवाने पंतप्रधान मांडत असलेल्या गोष्टीचं राजकारण आम्ही कधी पाहिलं नाही. मी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री यांच्यापासून सर्व पंतप्रधानांची भाषणं ऐकली आहेत.”
हेही वाचा : “विधानसभेला अनिल पाटील निवडून आलेले दिसणार नाहीत, याची…”, शरद पवारांनी दिला सूचक इशारा
“पंतप्रधान विरोधकांच्या राज्यात गेले, तर व्यक्तिगत हल्ले करतात. चार राज्यांच्या निवडणुकीतही हेच चित्र दिसत आहे. लोक हे मान्य करणार नाही आणि त्याची किंमत पंतप्रधानांना चुकवावी लागेल,” अशा इशारा शरद पवारांनी दिला होता.
शरद पवारांनी पंतप्रधानांबद्दल केलेल्या वक्तव्यावर विखे-पाटलांना नगरमध्ये प्रसारमाध्यमांनी विचारलं. त्यावर विखे पाटील म्हणाले, “शरद पवारांच्या विधानाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष देतील, असं वाटत नाही. कारण, सध्या शरद पवारांच्या जातीचा विषय सगळीकडे चर्चिला जात आहे. ‘मी जातीचं राजकारण कधीच केलं नाही,’ असं शरद पवार सांगतात. त्यामुळे शरद पवारांनी गर्वाने एकदा मराठा असल्याचं सांगावं. अथवा ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा शरद पवारांनी द्यावी, म्हणजे प्रश्न संपून जाईल.”