कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल आणि कल्याणमधील सिनेमागृहात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता, अशी माहिती राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबई सत्र न्यायालयात दिली आहे. हे दोन्ही कट उधळून लावण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपारासह राज्याच्या अन्य भागातून स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला होता. या प्रकरणी अटक झालेल्यांचे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर या आरोपींना मंगळवारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयात केली.

एटीएसच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण माहिती दिली. कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा कल्याण आणि बेळगाव येथील सिनेमागृहात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता. तसेच पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्येही स्फोट घडवण्याचा आरोपींचा कट होता. हा फेस्टिव्हल हिंदू संस्कृतीच्या विरोधात असल्याचा आरोपींना वाटत होते, अशी माहिती एटीएसच्या वतीने न्यायालयात देण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radical hindu terror plot accused involved to bomb cinema theatres in kalyan
First published on: 28-08-2018 at 17:05 IST