राहाता : कोपरगावच्या निवडणुकीत महायुतीत बेबनाव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली मित्रपक्षांची आघाडी व भाजपच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहलता कोल्हे व त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांची लोकसेवा आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. शिर्डी व राहातामध्ये जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकसंघ राहिली आहे.

कोपरगावमध्ये महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट झाले नाही तर शिर्डी व राहतामध्ये आघाडीचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी कोपरगाव, शिर्डी व राहाता या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोपरगाव, शिर्डी व राहाता निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतरच महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

शिर्डीत महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष जयश्री विष्णु थोरात (भाजप), राहात्यात डॉ. स्वाधिन गाडेकर (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर आघाडीकडून शिर्डीत माधुरी शेजवळ व राहात्यातून धनंजय गाडेकर यांनी अर्ज दाखल केले.

शिर्डीत महायुतीत राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) या गटांना काही जागा देण्यात आल्या आहेत. शिर्डीचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यानंतर शिर्डीतून शेजवळ, थोरात, त्रिभुवन, सावकारे, गायकवाड, भुजबळ या आडनावाच्या व्यक्तींमध्ये उमेदवारी मिळण्याकरिता चढाओढ सुरू झाली होती व नगराध्यक्ष पद असणाऱ्या व्यक्तींना साई संस्थानमध्ये विश्वस्त होण्याचा मान मिळत असल्याने प्रमुख्याने महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला संधी मिळावी म्हणून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अखेर विखे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी जयश्री थोरात यांना संधी देण्यात आली.

राहाताचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असल्याने राहात्यात प्रमुख्याने माळी समाजाला संधी मिळाली. त्याच आधारावर आघाडी कडून धनंजय गाडेकर तर महायुतीकडून डॉ. स्वाधिन गाडेकर निवडणुक रिंगणात उतरले आहे.