काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत देण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबत पत्रक काढत खासदारकी परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे, राहुल गांधी आज लोकसभेत जाण्याची शक्यता आहे. यावरून, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्तेविरोधात गांधींचाच विजय होईल”, असं नाना पटोले टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, ज्या पद्धतीने राहुल गांधींनी मोदी आणि अदाणी यांचा संबंध काय? असे अनेक प्रश्न सभागृहात विचारले आणि मोदींना वाटलं माझं पितळ उघड होईल. सत्य जनतेसमोर येईल. म्हणून खोटा आरोप करून राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा देण्याची व्यवस्था निर्माण केली. पण सत्यमेव जयते. अखेर सत्याचा विजय झाला. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

ते पुढे म्हणाले की, गोऱ्यांविरोधातही गांधी लढले होते, ज्यात गांधींचा विजय झाला होता. आज देशविरोधी व्यवस्था, संवैधानिक व्यवस्थेला संपवायला सत्ताधारी बसले आहेत, देश विकून देश चालवणारी व्यवस्था सत्तेवर बसली आहे. सत्तेविरोधात गांधींचाच विजय होईल, याची सुरुवात झाली आहे.

“राहुल गांधी आज लोकसभेत जातील. योगायोग असा आहे की नरेंद्र मोदींवर अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे राहुल गांधींना लोकसभेत सविस्तर चर्चा करता येईल. त्यामुळे देशातील वस्तुस्थिती जनतेसमोर जाणार आहे. हा सत्याचा विजय होणार. राहुल गांधींनी त्याची सुरुवात केली”, असंही नाना पटोले म्हणाले.

“देशाच्या सर्वसामान्यांमध्ये आनंदाची लहर आली. फक्त काँग्रेसच्याच नाही तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड आहे. लोकशाही आणि न्यायव्यवस्था जिवंत आहे असा संदेश यानिमित्ताने जातो”, असंही ते पुढे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी कर्नाटकच्या कोलारमध्ये मोदी आडनावाचा उल्लेख केला होता. सर्वच चोरांचं आडनाव मोदी कसं असतं? अशी खोचक टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर भाजपाचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्यासंदर्भात आधी सत्र न्यायालय व नंतर गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत त्यांना २ वर्षांची कमाल शिक्षा ठोठावली होती.

२ वर्षं शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे राहुल गांधींची खासदारकी तातडीने रद्द करण्यात आली होती. मात्र, याविरोधात काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला न्यायालयानं स्थगिती दिली आहे. तसेच, “सर्वाधिक शिक्षा देण्याची गरज काय होती?” असा सवाल करत न्यायालयानं या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

लोकसभेच्या कामकाजात सहभागी होणार!

दरम्यान, आता राहुल गांधी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होणार असून त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातल्या अविश्वास ठरावासंदर्भात आता मोदी स्वत: लोकसभेत निवेदन करणार आहेत. त्यावेळी होणाऱ्या चर्चेतही राहुल गांधी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. तसेच, आज राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मांडलं जाणार असून त्यासंदर्भातही काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.