scorecardresearch

“राहुल गांधींनी माफी मागावी”, सावरकरांवरील वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळ, संजय शिरसाट आक्रमक, म्हणाले, “यांनी कसाबचा…”

सत्ताधारी आमदारांच्या गोंधळानंतर महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

Ashish Shelar, Sanjay Shirsat
राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्याचे महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात पडसाद पाहायला मिळाले.

राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यामुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी लावून धरली. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आमदार संजय शिरसाट आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधासभेत मोठा गोंधळ घातला, तसेच काँग्रेस आमदारांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणीदेखील केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा गोंधळ रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी आमदार काही थांबले नाहीत. अखेर नार्वेकर यांनी १० मिनिटांसाठी विधानसभा स्थगित केली.

यावेळी आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडलं होतं. ही तीच काँग्रेस आहे. आमच्या काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांनी आणि काँग्रेस आमदारांनी सांगावं की, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याला तुमचा पाठिंबा आहे का? सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्याबद्दलचं असं वक्तव्य आम्ही ऐकून घेणार नाही. या काँग्रेसने दहशतवादी अजमल कसाबचा उदो उदो केला, त्याला बिर्याणी चारली. त्यांचा राहुल गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा असेल तर त्याने आम्हाला काही फरक पडत नाही.”

हे ही वाचा >> “आता तरी माझं ऐकाल का?” छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, “त्यांनी मला…”

विधानसभा १० मिनिटांसाठी स्थगित

शिरसाट म्हणाले की, “सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात ठराव मांडू इच्छितो, त्याला परवानगी द्या.” यावर विधानसभा अध्यक्ष काही बोलणार इतक्यात आमदार आशिष शेलार यांनी माफीची मागणी लावून धरली. परिणामी विधासभेत मोठा गोंधळ झाला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केलं. आज (२३ मार्च) विधानसभा स्थगित करण्याची ही दुसरी वेळ आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 13:02 IST

संबंधित बातम्या