सातारा- करोना काळात मृत झालेल्या शेकडो रुग्णांना जिवंत दाखवून त्या आधारे सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले, असा आरोप करत आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख यांच्या घरावर ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी छापे टाकले. हेही वाचा >>> Radhakrishna Vikhe : “मुलाचा छंद किती पुरवायचा ते तुम्ही…”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर पलटवार देशमुख कुटुंबीयांचे मायणी नजिकच्या शिंदेवाडी (ता.खटाव) येथे घर आहे. येथेही छापे टाकण्यात आले. या घराशेजारीच देशमुख कुटुंबाची दूध डेअरी आहे. या डेअरीतील कर्मचाऱ्यांना बोलावून ईडीचे अधिकारी चौकशी करीत असल्याचे देशमुख कुटुंबीयांच्या सूत्रांनी सांगितले. देशमुख कुटुंबातील प्रमुख डॉ. एम. आर. देशमुख यांनी सामाजिक हेतूने मायणी येथे वैद्यकीय महाविदयालय सुरु केले आहे. देशमुख व त्यांचे भाऊ आप्पासाहेब देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी ‘ईडी’ने कारवाई केली होती. हे दोन्ही बंधू अजून तुरुंगातच आहेत. अशातच आता त्यांचा मुलगा व महाविद्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. दीपक देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आजच्या छाप्याबाबतचा तपशील ईडीकडून रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला नव्हता.