संगमनेर: गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत आमदार अमोल खताळ यांनी वरिष्ठांना खोटी माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस दलाने आज, बुधवारी दुसऱ्यांदा बेकायदा कत्तलखान्यावर छापा टाकत सुमारे १२.५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, याही वेळी आरोपी आश्चर्यकारकरीत्या पसार झाले.

मध्यरात्री दीडच्या सुमारास शहरातील तीन बत्ती चौकात थांबलेले पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर ५ येथील फैजु फारुक कुरेशी यांच्या पत्र्याच्या वाड्यात कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुढन कुरेशी हे गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत, अशी माहिती मिळाली. पोलीस नाईक राहुल कचरु डोके, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलग आणि कॉन्स्टेबल राहुल सारबंदे त्यांच्या पथकाने फैजु फारुक कुरेशी यांच्या वाड्यावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपी कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुढन कुरेशी यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोमांस आणि गोमांसाचे अनावश्यक अवयव आढळले. एक कोयता, एक लोखंडी हुक असलेला वजन काटा, महिंद्रा झायलो जीप (एमएच ०२ बीएम १५०३) गाडी, रु. ७,५०,००० किमतीचे अंदाजे २५०० किलो गोमांस आणि अवयव असा एकूण १२ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे. या संदर्भात पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कमरअली गुलाम जिलानी सौदागर, शहबाज बुढन कुरेशी (दोघे रा. जमजम कॉलनी, संगमनेर) आणि त्यांना जागा व लाईटची सुविधा उपलब्ध करून देणारा फैजु फारुक कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) या तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३५ वासरांची सुटका

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ३५ लहान वासरे ताब्यात घेऊन एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई कुरण येथील कब्रस्तानजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. कुरण येथील शौकतअली मोहम्मद शेख (वय ३०, रा. कुरण) याने आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर तेथून पोलिसांनी ३५ वासरे ताब्यात घेतली आणि गोशाळेत पाठवली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, शौकतअली मोहम्मद शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.