जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात मृगाचा दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची कामे आटोपली आणि नंतर दीड महिन्यापासून पावसाने रुसवा धरला. दीर्घ खंडानंतर मंगळवारी पहाटे हलक्या स्वरूपात पावसाने सुरुवात केली. गुरुवारी दुपापर्यंत या प्रकारे पाऊस पडत होता. आतापर्यंत जिल्ह्यात २७३.०२ मिमी पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्हय़ातील सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला. प्रशासनाने ४ गावांत सुरू केलेल्या ३ टँकरची मुदत ३१ जुलैस संपली. ती १५ ऑगस्टपर्यंत वाढवली. गुराढोरांना रानामाळात कुठेच पिण्याचे पाणी नसल्याने गावातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. या स्थितीमुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला होता.
मंगळवारी पहाटे हलक्या स्वरूपाच्या पावसाने सुरुवात केली. गुरुवारी सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती, मात्र गेल्या तीन दिवसांत सूर्यदर्शन घडले नाही. गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची गुरुवारी सकाळी ८ वाजता घेतलेली नोंद मिमीमध्ये (कंसात एकूण पडलेला पाऊस) :  िहगोली २१.१४ (३४०.८७), वसमत १३ (१५८.५७), कळमनुरी १७.५५(२५५.९१), औंढा २९.२५(२५२.७५), सेनगाव २१.१७ (३५७), एकूण १०२.११ (१३६५.१०). सरासरी २७३.०२. टक्केवारी ३०.६६. गतवर्षी टक्केवारी १७.०७ होती. गेल्या ३ दिवसांपासून पडलेल्या रिमझिम पावसामुळे गुराढोरांच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. उर्वरित पिकांना जीवदानही मिळणार आहे.