लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : तीव्र उष्म्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना बुधवारी दुपारी वादळवाऱ्यासह झालेल्या पावसाने दिलासा दिला. तासगावच्या उत्तर भागात दमदार पाऊस झाला, तर पुर्वेकडील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ भाजून काढणाऱ्या उष्म्याने हैराण झाले आहेत.

गेल्या आठ दिवसापासून उष्मा वाढता असून बुधवारी सांगलीचा पारा ४१ अंश सेल्सियस या सर्वोच्च पातळीवर पोहचला. ढगाळ हवामान, ४० टक्के आर्द्रता यामुळे अस्वस्थपणा वाढला आहे. दुपारी जोरदार वादळ वारे आणि वीजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.तासगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात बुधवारी साडेतीन च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने गारवा दिला. द्राक्ष बागांची फळकाडी तयार होण्यासाठी हा पाऊस पोषक आहे.

आणखी वाचा-सांगली : म्हैसाळ तपासणी नाक्यावर ११ लाख ६० हजाराचा गुटखा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तासगाव तालुक्यात काही ठिकाणी द्राक्ष हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. दर नसल्याने यंदा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच सततच्या अवकाळीच्या दणक्याने बागायतदार हबकला आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे बेदाणा शेडवर टाकलेल्या द्राक्षांचा रंग बदलून बेदाणा काळा पडण्याची व प्रतवारी खालावण्याची भिती आहे. आजच्या पावसामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र द्राक्षबागांची काडी तयार होण्यास व उन्हाळी मशागतींसाठी हा पाऊस उपयुक्त आहे.