Sanjay Raut : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरून चर्चेला जोर आला आहे. दोन्ही पक्षातील नेते सकारात्मक असून कार्यकर्त्यांचंही स्थानिक पातळीवर मनोमिलन सुरू झालं आहे. दरम्यान, हे दोन्ही नेते एकत्र कधी येणार? मनसे-शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची युती कधी होणार? याबाबत अधिकृत माहिती कधी येणार? असे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. यावर आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

नेते सकारात्मक असून कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे, याबाबत संजय राऊतांना आज विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांच मनोमिलन सुरू आहे. सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्याने त्याचा परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असेल. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मुलांच्या जन्माच्या आधीपसून हे भाऊ आहेत ना.”

दरम्यान, आदित्य आणि अमित ठाकरेंनी म्हटलं होतं की या राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. त्यांना युती करायची असेल तर ते एकमेकांना फोन करतील. याबाबत संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले, “या दोघांमध्ये फोन झालेही असतील. तुम्हाला फळ दिसल्याशी कारण आहे ना. युतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

शस्त्रविराम करताना देशाला विचारलं होतं का?

“घराघरात सिंदूर वाटायला जाताय, तुम्ही कोणता पराक्रम केला आहे. पराक्रम भारतीय लष्कराने केला आहे. तुम्ही राजकीय फायदा घेण्याचं काम करताय. मग याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. तुम्ही ज्यापद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन युद्धविराम केलंत, तेव्हा देशाला विचारलं होतं का? संसदेला विचारलं होतं का? आपली फौज पुढे निघून गेली, परराष्ट्र मंत्री म्हणत होते की पीओके दोन दिवसांत ताब्यात येईल. पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाबावाखाली येऊन तुम्ही वाकलात. भारता असा कोणासमोरही वाकला नव्हता. देशाचं नेतृत्व कोणासमोर असं झुकलं असेल तर त्याला शरणागतीच म्हणतात”, अशी टीकाही त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.