हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश मागे घेतला. ज्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ५ जुलैच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले होते. त्यानंतर ते महापालिका निवडणूक एकत्र लढवतील का? याची चर्चा सुरु झाली. आता संजय राऊत यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
राजकीय वर्तुळात काय चर्चा सुरु आहेत?
आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणार असं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठं विधान केलं.भारत देश हा धार्मिक आणि श्रद्धाळू होता पण भाजपाने तो धर्मांध केला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहेच. दरम्यान त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणूक जिंकतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वज्रमूठ कायम राहणार-राऊत
राज ठाकरे चुकीचं काय बोलले? मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे एकत्र लढणार आहेत. नाशिक, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका, मुंबई महापालिका अशा अनेक महापालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. त्याबाबत आमच्या चर्चा सुरु आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही राहणार, कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली तरीही ही वज्रमूठ कायम राहणार, ती कुणीही तोडू शकत नाही असंही राऊत म्हणाले.
मोर्चाला कोण एकत्र असतील का त्यापेक्षा जिल्ह्यातले, शहरातले दोन्ही पक्ष आणि कार्यकर्ते सहभागी असतील असंही राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे आता आगामी काळात महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे.