Raj Thackeray : महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यानंतर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी सविस्तर भूमिका मांडली. निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
काय म्हणाले राज ठाकरे?
मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्यासमोर आणि राज्याच्या जनतेसमोर ठेवायची आहे. निवडणूक म्हटली की राजकीय पक्ष आले आणि महाराष्ट्रातला मतदार आले. निवडणूक आयोग हे फक्त निवडणुका घेतात. पण राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवतच नसेल तर मला वाटतं की पहिला घोळ इथे आहे. असं राज ठाकरे म्हणाले.
मतदार याद्यांचा घोळ कसा आहे? राज ठाकरेंनी वाचली यादी
२०२४ च्या निवडणुका होण्याच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतरच्या दोन याद्या तुम्हाला दाखवतो. २०२४ च्या निवडणुका झाल्या त्यावेळी मतदारांची यादी त्यातला तपशील मी वाचून दाखवतो. त्यावरुन तुम्हाला कल्पना येईल. २०२४ च्या निवडणुकीच्या आधी जी नावं आहेत ती वाचतो म्हणजे घोळ लक्षात येईल. मतदारसंघ १६० कांदिवली पूर्व, मतदाराचं नाव धनश्री कदम, वडिलांचं नाव दीपक कदम वय वर्षे २३, आता वडिलांचं नाव दीपक कदम, त्यांच्या वडिलांचं नाव रघुनाथ कदम, वय वर्षे ११७, मतदार संघ १६१ नाव नंदिनी चव्हाण, वडिलांचं नाव महेंद्र चव्हाण वय वर्षे १२४, वडिलांचे तपशील नाव महेंद्र चव्हाण, वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय ४३. कुणी कुणाला जन्म दिलाय तेच कळत नाही. २०२४ च्या निवडणुकीच्या आधीचा हा घोळ. २०२४ च्या निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने नावं जाहीर केली. त्यात फक्त नावं आहेत. फोटो नाही, पत्ते नाहीत काहीही नाही. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले तेव्हा त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं. राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं. दोघंही प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाचेच आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना मतदार याद्या न दाखवून तुम्हाला काय मिळणार आहे? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
निवडणूक आयोगाला आम्ही हेच सांगितल आहे की…
आम्ही आत्ता त्यांना हेच सांगितलं आहे मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागची पाच वर्षे झालेल्या नाहीत. याद्या सुधारण्यासाठी अजून सहाम महिने गेले तर काय फरक पडतो. आमची भेट झाल्यानंतर त्यांनी नोटिफिकेशन काढलं. त्यांनी आठ दिवसांची मुदत राजकीय पक्षांना दिली आहे. निवडणूक आयोग सहा, आठ महिने घेणार आम्ही आठ दिवसांत काय निर्णय घेणार? आम्ही नोटिफिकेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ते पाहून आम्ही पुढची भूमिका ठरवू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.