शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सभा पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“आपल्या विरोधात सर्व एकत्र येतात नाहीतर इतरवेळी भांडत असतात. राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचे ठरवले. मातोश्री काय मशिद आहे का? त्यानंतर अटक करण्यात आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. एवढं सगळं पाहिल्यानंतर लडाखमध्ये हे दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसत आहेत. शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना या गोष्टींचे काहीच वाटत नाही. हे सगळे ढोंगी आहेत,” असे राज ठाकरे म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांच्या सभेत आमचे खरे आणि तुमचे खोटे हिंदुत्व असे म्हटले. तुम्ही वॉशिंग पावडर विकत आहात का? महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती होती आणि त्यासाठी उत्तर प्रदेशातून हजारो लोक तिथे आले होते. मी माझ्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत भेटून बोलून घ्यायला सांगितले. तिथे बोलताना एका मुलाने एका पदाधिकाऱ्याला आईवरुन शिवी दिली आणि तिथून सगळे प्रकरण सुरु झाले. महाराष्ट्रात रेल्वे भरती असून इथे जाहिराती नव्हत्या, इथल्या मुलांना काही माहिती नव्हते. त्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये येत होत्या. याबद्दल बोलायचे नाही. त्यानंतर ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी रेल्वे परीक्षा स्थानिक भाषांमध्ये घेतल्या जातील असे सांगितले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना नोकऱ्या मिळाल्या. हे आंदोलनाचे यश आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी मला एक गोष्ट सांगावी की तुमच्या अंगावर आंदोलन केल्याचा एक गुन्हा तरी आहे का. परवा दिवशी संभाजीनगरचे नामांतर झाले काय आणि नाही काय, मी बोलतो आहे ना असे म्हणाले. पण तुम्ही कोण आहात? तुम्ही वल्लभ भाई पटेल की महात्मा गांधी आहात? तुम्ही बोलताय त्याला काही तर्क आहे का? संभाजीनगरचा प्रश्न निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सतत जिवंत ठेवायचा आहे आणि त्यावरुन मते मिळवायची आहेत. संभाजीनगर झाले तर बोलायचे कशावर? शहरांमध्ये १०-१० दिवस पाणी येत नाहीये. ते विषयच नाहीत,” असे राज ठाकरेंनी म्हटले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“संभाजीनगर नामांतर करायची गरज काय ? आहेच तेे संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे. ओवेसी येऊन गेला. तिथे औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवलं. यांच्या ए टीम बी टीम पाठवल्या जात आहे. कुणाच्या हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा देणार आणि हे मजा बघत बसणार आहे. आम्ही मग काय टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेण्यासाठी बसलो आहोत का?,”  असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला होता.