प्रभू रामचंद्रांचा वनवास चौदा वर्षांचा होता. या कालवाधीत त्यांनी राक्षसांचा वध केला. वानरसेना उभी केली, रावणाला मारुन सीतेची सुटका केली. ते अयोध्येला परतले. त्यानंतर रामराज्य आलं. चौदा वर्षांच्या कालावधीत इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या मात्र सद्यस्थितीत मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक साठी १४ वर्षे लागली, एक पूल होण्यासाठी चौदा वर्षे? कसला विकास झाला? असे प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत टोलेबाजी केली.

“प्रभू रामचंद्र अयोध्येतून वनवासासाठी गेले होते. त्यांच्यासोबत सीतामाता आणि लक्ष्मणही गेले होते. वनवासाच्या कालावधीत राम, सीता आणि लक्ष्मण हे पर्णकुटीत रहात होते. सीतेला सुवर्णमृग दिसला त्याची चोळी शिवायची अशी इच्छा प्रभू रामाला तिने बोलून दाखवली. त्यानंतर राम सुवर्णमृगाच्या मागे गेले. काही वेळातच वाचवा वाचवा असा आवाज आला. लक्ष्मण रामाची हाक ऐकून गेला. त्याआधी त्याने पर्णकुटीभोवती लक्ष्मणरेषा आखली होती. त्यानंतर एक साधू आला तो रावण होता. रावणाने सीतेला पळवलं. मग प्रभू रामाने सीतेचा शोध घेतला, वानरसेना, हनुमान सगळे त्यांना भेटले. सीतेला रावणाने पळवून नेल्याचं समजलं. त्यानंतर कुंभकर्ण, मेघनाथ यांचे वध झाले. शेवटी रावणाचा वध करण्यात आला. मग सीतेची सुटका करण्यात आली. राम, सीता आणि लक्ष्मण हे तिघेही अयोध्येला परतले. या सगळ्याला १४ वर्षांचा कालावधी लागला. या कालवाधीत इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र हे मुंबईत काय घडलं ठाऊक आहे? १४ वर्षांचाच कालावधी वांद्रे वरळी सी लिंक होण्यासाठी लागला,” असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरं बकाल होत आहेत कारण परराज्यातून लोंढेच्या लोंढे या ठिकाणी येत आहेत. परराज्यातून लोंढे येण्याचं सर्वाधिक प्रमाण ठाणे जिल्हा, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी आहे. याचा जोपर्यंत बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत ही शहरं अशीच बकाल होत राहणार. डोंबिवली म्हणजे स्मार्ट लोकांचं बकाल शहर आहे असाही टोला राज ठाकरेंनी यावेळी लगावला.