मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या दूध, दह्यावर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना टोला लगावला आहे. “माझ्यामते दूध, दह्यावर जीएसटी लावण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावला पाहिजे,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. ते शनिवारी (२३ जुलै) झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “आत्ता दूध, दह्यावर जीएसटी लावण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावला पाहिजे. कारण त्यावर कुणाला वाटेल ते तो काहीही तेथे टाकत असतो. हल्ली सगळीकडे अगदी पत्रकारितेतही हीच गोष्ट झालेली आहे. अनेक स्तंभलेखक वेगवेगळ्या पक्षाचे झाले आहेत. स्वतंत्र पत्रकार खूप कमी उरले आहेत.”

“बहुतांश पत्रकारांमध्ये कोण हा पक्षाचा, कोण त्या पक्षाच्या विचाराचा असं झालंय. तेच पत्रकार काही तरी लिहून देतात आणि मग व्हॉट्सअ‍ॅपवर टाकतात. त्यानंतर आमचे लोक आहेतच धक्का द्यायला. ते धक्के देत पुढे पुढे ‘फॉरवर्ड’ राहतात,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.

“कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही”

राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मला आत्ताची राजकीय स्थिती पाहून मला चुकीचा कॅरम फुटल्यावर जसं कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हे कळत नाही तसं वाटतंय. कोण कुठे आहे हेच कळत नाहीये. आत्ता लोकांना आपण मतदान कुणाला केलं होतं हेही कळत नसेल.”

“मतदान झालं, मतदानानंतर निकाल आले. निकाल लागल्यानंतर एक दिवस पहाटे शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी राज्यपालांकडून शपथ घेतली. मग ते फिस्कटलं आणि शरद पवार व उद्धव ठाकरेंची बैठक झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी युती झाली. त्याचं एक सरकार स्थापन झालं. आता त्यातून काही आमदार फुटले आणि ते भाजपाकडे गेले. आता भाजपाचा सत्तेत आलाय आणि मुख्यमंत्री जे फुटले त्यांचा झालाय,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

“राजकीय दृष्ट्या असा महाराष्ट्र कधीच बघितला नाही”

“महाराष्ट्रात काय चाललं आहे? आपण राजकीय दृष्ट्या असा महाराष्ट्र कधीच बघितला नाही. याचं कारण यांना लोकांच्या मतांची किंमत नाही,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

“भावनेच्या आहारी जाऊन लोक त्याच त्याच लोकांना मतदान करत बसतात”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “लोक बाळासाहेब होते म्हणून भावनेच्या आहारी जाऊन त्याच त्याच लोकांना मतदान करत बसतात. मात्र, बाळासाहेब कुठे आहेत? या भावनांना काय अर्थ आहे का? दिवसेंदिवस आपण महाराष्ट्र मागे नेत आहोत याचा साधा विचारही मनात येत नाही.”

“लोकांनी फुकटचं उन्हात उभं राहून यांना मतदान करत राहायचं का?”

“जे आमदार आपण निवडून देतोय तो आमदार भलतीकडेच जातोय. तोच आमदार पैसे घेऊन आणखी तिसऱ्याकडे जातोय. काय चाललंय. लोकांनी फुकटचं उन्हात उभं राहून यांना मतदान करत राहायचं का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

हेही वाचा : “बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली”; राज ठाकरेंचं मोठं विधान

“प्रादेशिक पक्षांना संपवणं हाच भाजपाचा अजेंडा”, शिवसेनेच्या आरोपावर राज ठाकरे म्हणाले…

राज ठाकरे म्हणाले, “पश्चिम बंगाल, तामिळनाडूत सर्वांनी पाहिलं की असा कुणी संपवला ठरवून कुणी संपत नाही. तुम्ही हाराकिरी केली तर त्याला परमेश्वरही वाचवू शकत नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला मी मोठा व्हावा असं वाटतं. यात काहीच चुकीचं नाही. समोरचा संपावा आणि मला राज्य मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, समोरच्याने आपापला विचार करायचा असतो. मी कसा वाढेन हा विचार केला पाहिजे.”

हेही वाचा : शरद पवारांनी सांगितलं म्हणून मनसेची स्थापना केली का? राज ठाकरे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्हीच आत्मघात करायचं ठरवलं तर समोरच्या पक्षाने काय करायचं?”

“एखाद्याची रेष खोडण्यापेक्षा मी माझी रेषा ओढेन असं आपल्याकडे म्हणतात. मात्र, हा विचारच दिसत नाही. तुम्हीच आत्मघात करायचं ठरवलं तर समोरच्या पक्षाने काय करायचं? काहीच करू शकत नाही,” असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.