Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मातोश्री या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दुसऱ्यांदा गेल्याचं पाहण्यास मिळालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मागील तीन महिन्यांतली ही पाचवी भेट आहे. संजय राऊत यांच्या घरी त्यांच्या नातवाच्या बारशासाच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू पोहचले होते. त्यानंतर राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर गेले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमातून राज ठाकरे मातोश्रीवर

संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमातून राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या आधीच निघाले होते. तिथून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मातोश्रीवर ते पोहोचले. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवर पोहोचले. यावेळी राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे देखील होत्या. शर्मिला ठाकरे या अनेक वर्षांनी मातोश्रीवर दाखल झाल्या. या कौटुंबिक जवळीकीमुळे दोन्ही बंधूमधील वाद संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

ठाकरे कुटुंबाचं फोटोसेशन

संजय राऊत यांच्या नातवाचं आज बारसं होतं. या कार्यक्रमात राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह पोहचले होते. तर, उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दाखल झाले. कार्यक्रमात उद्धव आणि राज यांच्यात काही वेळ चर्चाही झाली. बारशाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित फोटोदेखील काढला. यावेळी राज ठाकरे यांच्या शेजारी आदित्य ठाकरे उभे राहिले होते.

ठाकरे बंधू तीन महिन्यांत किती वेळा भेटले?

५ जुलै २०२५ : विजयी मेळावा, ठाकरे बंधू २० वर्षांनी एकाच मंचावर

२७ जुलै २०२५ : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर

२७ ऑगस्ट २०२५ : गणेश उत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवीतर्थ या निवासस्थानी

१० सप्टेंबर २०२५ : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्यासह राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

५ ऑक्टोबर २०२५ : संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशानंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहचले

अशा या पाच भेटी मागील तीन महिन्यांत झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येणार हे निश्चित मानलं जातं आहे. दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी ५ जुलैच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते, मी तेव्हाच म्हटलं होतं एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू आगामी काळातही चर्चेत असतील यात शंका नाही. त्यांच्या एकत्र येण्याने आगामी महापालिका निवडणुकांवर कसा परिणाम होतो हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.