Raj Thackeray on marathi Language Conflict : राज्यात मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हिंदीच्या सक्तीवरूनही मनसेने मोठं आंदोलन छेडलं. तसंच, कर्नाटकात कन्नड भाषेवरूनही सरकारने ठाम भूमिका घेऊन भाषेला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली केली. यावरून देशाला राष्ट्रभाषेची गरज आहे का? किंवा सरकारकडून हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो का? अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चोख उत्तर दिलं आहे. ते मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
कन्नड भाषेच्या बाबतीत भाषेचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा सर्वपक्ष एकवटले अन् त्या कर्मचाऱ्याची बदली झाली. महाराष्ट्रात असं दिसत नाही. हा फरक का जाणवतो? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “ती सर्व राज्य हे आपल्या भाषेसाठी कडवट असतात. अत्यंत अभिमानाने आपली भाषा बोलत असतात, वाढवत असतात, समृद्ध करत असतात. माझ्या एकदा भाषणात म्हटलं होतं की महाराष्ट्र देशाचा विचार करतो, पण इतर राज्य आप-आपल्या राज्याचा विचार करतो. मी आमच्या पक्षातील लोकांना सांगितलं आहे की सुरुवातीला हात जोडून जा, नाही ऐकलं तर हात सोडून जा. हात जोडूनही ऐकत नसतील तर करायचं काय? आम्ही पहिल्यांदा हात सोडून गेलोय आणि मग हात जोडून गेलोय असं झालंय नाहीय ना. मराठी भाषेसाठी झालेली आंदोलने नेटवर शोधलीत तरी तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच दिसेल.”
“हिंदी सक्तीच्या विरोधातही आम्हीच होतो. आता त्यांनी माघार घेतली असली तरीही आम्ही शाळेत असं (तिसरी हिंदी भाषा) होऊ देणार नाही. तिसरी भाषा नकोच. तुमची मातृभाषा आणि जागतिक भाषा म्हणून इंग्रजी झाली. मग हिंदी भाषा का पाहिजे. त्यामुळे ही भाषा लादायचा विचार केलात तर त्याला प्रत्येक राज्यातून विरोध होणारच. भाषा शिकणं ही ऐच्छिक गोष्ट असेल”, असंही ते पुढे म्हणाले.
“जिओ अॅपवर अनेक इंग्रजी चित्रपट मराठीत डब केलेले आहेत. भरपूर चित्रपट मराठीत डब केलेले आहेत. ते चित्रपट महाराष्ट्रातील लोकांनी मराठीतून पाहिले पाहिजेत. अव्हेंजरसारखा चित्रपट तमिळ माणूस तमिळमध्ये पाहताना हसत नाही. मला वाटतं की आपल्या भाषेबद्दलचा अभिमान बाळगला पाहिजे. आपल्याला स्वतःच्या भाषेबद्दल प्रेम असलं पाहिजे. ती भाषा जास्तीत जास्त कशी वाढवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे”, असंही ते म्हणाले. तसंच, “जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता मराठी पोरं हिंदीतून रिल्स करत आहेत”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आपल्याला अभिमान असला पाहिजे की शिवाजी महाराजही मराठी बोलत असतील. माझी भाषा माझे महाराज बोलायचे याचाही आपल्याला अभिमान वाटत नाही? असा सवालही त्यांनी मराठी माणसांना विचारला.
“हिंदी ही राष्ट्रभाषा करण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. तुम्ही कितीही गोष्टी आणायचा प्रयत्न करा. आपल्या वाचनात आलेल्या अनेक गोष्टी आहेत, किंवा अनेकांनी सांगितल्या आहेत की महात्मा गांधी शेवटपर्यंत गुजरातीच बोलायचे. तसंच, नरेंद्र मोदींना किंवा अमित शाहांना अंबानी आणि अदानी जेवढे जवळचे वाटतात तेवढे टाटा का वाटत नाहीत? कारण ते त्यांच्या राज्यातील, त्यांच्या भाषेतील व्यक्ती आहेत”, असंही राज ठाकरे म्हणाले.