Raj Thackeray : राज्यात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्यांवरून व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यावरून जाहीर इशारा दिला. ‘मराठीचा इतिहास २००० वर्षांचा, तरी मराठीच्या भाळी संघर्ष, पण हिंदीसाठी मात्र पायघड्या असे का?’, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे काय म्हणाले?
“आपण कोणती हिंदी घेऊन बसलो आहोत? हिंदी भाषेला साधा २०० वर्षांचा इतिहास आहे. पण मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. हिंदी ही भाषा या देशात कोणाचीही मातृभाषा नाही. ज्याच्या काल परवा कानाखाली मारली ना त्यालाही विचारा की त्याची मातृभाषा कोणती आहे? हिंदी ही इकडून तिकडून तयार झालेली २०० वर्षांपूर्वीची भाषा”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानला हे समजलं पाहिजे. हिंदी या भाषेने किती भाषा मारल्या, तर हिंदीने जवळपास २५० भाषा मारल्या. त्यामध्ये कांगणी, गडवाली, अवधी, भोजपूरी, माळवी, मारवाडी अशा अनेक भाषा हिंदीने मारल्या. आता बिहारने हिंदी स्वीकारली असली तरीही ९० टक्के लोक हे त्यांच्या मातृभाषेत बोलतात. मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रात का येतात? जर हिंदी भाषेमुळे तुमचं भलं झालं नसेल, तुमची राज्ये मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर इकडे येऊन नोकऱ्या मागाव्या लागत असतील तर मग हिंदी भाषेने तुमचं काय भलं केलं?”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
‘मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे…’
“माज घेऊन कोणी अंगावर आला तर त्याला ठेचायचा. भाजपाचा कोणीतरी खासदार दुबे नावाचा. काहीतरी बोलला. झाली का त्याच्यावर केस? हिंदी चॅनलने चालवलं का नाही? तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबे- तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे”, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मीरा भायंदर इथे झालेल्या सभेत राज यांनी दुबे यांच्या पटक पटक के मारेंगे या वक्तव्याचा समाचार घेतला.