Raj Thackeray on Maratha Reservation Protest : गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने आंदोलनं व उपोषणं करणारे मनोज जरांगे पाटील हे त्यांची मागणी घेऊन पुन्हा एकदा मुंबईत धडकले आहेत. जरांगे हे शुक्रवारपासून (२९ ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत धडकल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या सर्व घटनांवर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बातचीत करण्याचा व मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज ठाकरे म्हणाले, “तुमच्या व लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं केवळ एकच माणूस देऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देऊ शकतात.”
मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षणावरील वादाकडे कसं पाहता? असं विचारताच राज ठाकरे म्हणाले, “मी याचं उत्तर देऊ शकणार नाही. एकनाथ शिंदे तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्ही हे त्यांनाच विचारा. आरक्षणाबाबतची माझी भूमिका सर्वांना माहिती आहे. ते सगळं आता जुनं झालं. मात्र, सध्याच्या घटनांवर केवळ एकनाथ शिंदे हेच बोलू शकतात.”
एकनाथ शिंदे उत्तर देऊ शकतात : राज ठाकरे
“मुंबईतील वाहतूक कोंडी, तुम्ही (माध्यम) म्हणताय तसा लोकांना त्रास होतोय वगैरे गोष्टींवर शिंदे बोलू शकतात. कारण मागच्या वेळेस एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना? त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असं सांगितलं जात होतं. मग मराठा आंदोलक परत का आले या सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात.”
“आमचा अपमान करू नका”, मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की त्यांनी आरक्षणाबाबतच्या आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आंदोलकांना सन्मान द्या, आमचा अपमान करू नका.”