Raj Thackeray On Marathi Language: शेतकरी कामगार पक्षाचा आज ७८ वा वर्धापन दिन आहे. पणवेलमध्ये होत असलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित आहेत. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीबाबत भाष्य केले आहे. याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘मी गुजराती भाषिक आहे’, या विधानाचा दाखला देत भाषावादावर भाष्य केले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव (जयंत पाटील, शेकाप नेते) तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजे. शेतकरी बरबाद होणार नाही, या रायगड जिल्ह्यातील मराठी तरुण-तरुणींनी येथे आलेल्या उद्योग-धंद्यांमध्ये कामाला लागले पाहिजे, यासाठी सर्वपक्षीयांनी काम करणे गरजेचे आहे. बाकीची राज्ये पाहा. शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे आले होते, तेव्हा मी या विषयावरही बोललो होतो.”
ते पुढे म्हणाले की, “या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजरातचे आहेत. एका मुलाखतीत अमित शाह यांना भाषावादावर प्रश्न विचारला तेव्हा म्हणाले होते की, मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे. पाहा, देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो, नाही, मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे.’ मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प, डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेले.”
“प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असते. मग, आम्ही बोललो की संकोचित कसे होतो? मी जेव्हा त्यांना (दादा भुसे) म्हणालो, तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करत आहात, गुजरातमध्ये हिंदी आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, गुजरातमध्ये हिंदी नाही. मग विचारले, महाराष्ट्रात का आणत आहात? निवडणुका येतील, जातील यांचे काय राजकारण चालले आहे हे समजले पाहिजे”, असेही राज ठाकरे म्हणाले.
भाषा आणि राज्याविषयी बोलताना ते म्हणाले, “मी मागे एकदा भाषणात म्हणालो होतो, एकदा तुमची भाषा आणि जमीन गेली की, जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलेही स्थान नाही. गुजरातचे पाहा, तेथे कायदा आहे. गुजरातबाहेरील नागरिकाला तेथे शेतजमीन विकत घेता येत नाही. या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्या राज्याचे आहेत, त्यांच्या राज्यात जाऊन देशातील इतर कोणताही नागरिक शेतजमीन विकत घेऊ शकत नाही.”