महायुतीत सहभागी होण्याविषयी सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चाशी मनसेचा कोणताही संबंध नाही. या संदर्भात काही राजकीय पक्षांचे नेते आणि काही पत्रकारच उत्सुकता दाखवीत आहेत. या स्वरूपाची चर्चा राजकीय पक्ष वा त्यांच्या नेत्यांनी करू नये, असे आपण आधीच बजावले आहे. तरीदेखील हा प्रकार सुरू राहिल्यास राजकीय पक्षांच्या नेत्यांशी झालेली सर्व चर्चा आपण उघड करू, असा दम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेत्यांना भरला.
सोमवारी शहरातील विकासकामे व संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना-भाजप-रिपाइं (आठवले गट) यांच्या महायुतीत मनसे सहभागी होणार की नाही याबद्दल अनेक नेत्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ. नवाब मलिक यांनी त्यावर खोचकपणे टिप्पणी केली होती. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर राज यांनी मनसेचा या चर्चाशी कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला. पक्षप्रमुख म्हणून मनसेचे सर्व निर्णय आपणच घेतो. कोणाशी युती करण्याचा मनसेचा विचार नाही. परंतु, ही बाब सांगूनही काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार उलटसुलट विधाने करण्यात येत आहेत. या नेत्यांसह प्रसारमाध्यमे अशी युती घडविण्याबद्दल उत्सुकता दाखवीत आहेत. आपल्या पक्षाबद्दल या स्वरूपाची कोणतीही चर्चा पुन्हा होता कामा नये, असे राजकीय पक्षांना बजावले आहे. यापुढे कोणी अशी कपोलकल्पित चर्चा केल्यास यापूर्वी ज्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आपल्या भेटी झाल्या, त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील उघड केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा राज यांनी दिला. राज यांनी स्पष्टपणे एखाद्या नेत्याचे नांव घेणे टाळले असले तरी त्यांचा रोख भाजपच्या नेत्यांकडे होता. गेल्या काही महिन्यांत भाजपच्या नेत्यांनी राज यांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या आहेत. या नेत्यांकडून मनसेला महायुतीत समाविष्ट करण्यावरून चर्चा घडविली जात आहे. यामुळे राज यांची तंबी भाजपच्या नेत्यांसाठी असल्याचे उघड आहे.
भाजपच्या नेत्यांना फटकारताना राज यांनी उत्तराखंडमधील मदतकार्यात गुजरातने आघाडी घेतल्याचे मान्य करीत काँग्रेस आघाडीवर शरसंधान साधले. महाराष्ट्रातील टाटा समूहाचा ‘नॅनो’ मोटारींचा प्रकल्प नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये नेला. महाराष्ट्र शासनाने तेव्हा टाटा यांच्याशी साधी चर्चाही केली नाही. राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातील दुष्काळाकडे नीट लक्ष देता येत नाही, ते उत्तराखंडमध्ये काय मदतकार्य करणार, असा टोला राज यांनी लगावला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2013 रोजी प्रकाशित
..तर राजकीय नेत्यांशी झालेली चर्चा उघड करू
महायुतीत सहभागी होण्याविषयी सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चाशी मनसेचा कोणताही संबंध नाही. या संदर्भात काही राजकीय पक्षांचे नेते आणि काही पत्रकारच उत्सुकता दाखवीत आहेत. या स्वरूपाची चर्चा राजकीय पक्ष वा त्यांच्या नेत्यांनी करू नये, असे आपण आधीच बजावले आहे. तरीदेखील हा …

First published on: 25-06-2013 at 02:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray warn bjp leader indirectly over mns participation in grand alliance