Raj Thackeray on Unesco Heritage List: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असलेल्या महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. मराठा साम्राज्याचे सामर्थ्य दर्शवणाऱ्या १२ किल्ल्यांची निवड भारतातर्फे २०२४-२५ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी करण्यात आली होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या किल्ल्यांच्या यादीत साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग तसेच तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. या किल्ल्यांचा एकत्रित उल्लेख ‘मराठा लष्करी लँडस्केप्स’ असा करण्यात आला आहे. दरम्यान याची घोषणा झाल्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच सरकारला आवाहनही केले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या १२ किल्ल्यांमध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल”, असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचे किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील, पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा.”

तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे गेली असती

“आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचे, महाराष्ट्राचे वैभव दाखवावे, अशी परिस्थिती नव्हती. ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो. आम्ही हे गेली अनेक वर्षे म्हणत आलो आहे की, महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचे नीट जतन केले आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल”, अशी खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरू नका

राज ठाकरे पुढे म्हणाले, “फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका. सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका! त्यात जात – धर्म पहाण्याची गरज नाही!”