रत्नागिरी – राजापुर पोलिसांनी अणुस्कुरा घाटातील रायपाटण पोलीस दूरक्षेत्रच्या वतीने धडक कारवाई करत वाहनासह गोवा बनावटीच्या दारूचे ९५ बॉक्स पोलिसांनी जप्त केले. वाहनासह एकाला ताब्यात घेत तीन लाख ६३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

राजापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अणुस्कुरा तपासणी नाका येथे रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी नाकाबंदी करीत असताना अचानक टाटा कंपनीची टाटा इंट्रा (एमएच ०७ एजे ३७३९) ही गाडी आली असता तेथे उपस्थित असलेले पोलीस पथकाने ती गाडी थांबविली. या गाडीची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ९५ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी पकडलेल्या दारूची किंमत ६३ हजार ६५० रुपये असून याबरोबर सुमारे तीन लाख किंमतीचे वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून एकूण ३ लाख ६३ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा ६५(अ)(इ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.