एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होऊ लागलेली असताना दुसरीकडे शिवसेनेत आत्तापर्यंत दबून राहिलेले अंतर्गत मतभेद देखील समोर येऊ लागले आहेत. या निमित्ताने हे गट देखील एकमेकांसमोर उभे राहिल्याचं चित्र निर्माण झालं आहे. याचीच परिणती कोल्हापुरात दिसत असून इथे बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्यातील वाद उफाळून आला आहे. इंगवले यांनी कोल्हापुरात काढलेल्या मोर्चादरम्यान राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडल्यानंतर क्षीरसागर यांनी इंगवलेंना उघड धमकी दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात सध्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ठिकठिकाणी या आमदारांचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. पुण्यात तानाजी सावंत यांचं कार्यालय काही शिवसेना कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरात बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर शिवसेना कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान फाडण्यात आले. यावरून आता क्षीरसागर आणि इंगवले यांच्यात जुंपली आहे.

एकनाथ शिंदे गटातील आमदार मुंबईत कधी येणार? दीपक केसरकर म्हणाले…

आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण

इंगवलेंनी या मोर्चादरम्यान क्षीरसागर यांच्यावर टीका करताना शिवसेनेच्या नावावर जोगवा मागून प्रचंड माया कमावल्याचा आरोप केला. शिवसेनेनं त्यांना वैभव देऊन देखील त्यांनी गद्दारी केली, असं देखील इंगवले म्हणाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडीओच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी थेट उघड धमकीच दिली आहे.

“हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना ठणकावलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बिलकुल दम नसणारा हा गुंड गैरफायदा घेऊन माझे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला मी इशारा देतोय की तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे. रेकॉर्डिंग-रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर. हे बाकीचे खेळ बंद कर. माझ्यासारखा सुशिक्षित गुंड बाहेर पडला तर तुला पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. वैयक्तिक द्वेषाचा फायदा कुणी घेत असेल, शिवसेनेचं नुकसान होत असेल तर यांना पाठिशी घालू नका. शिवसेना मी सोडलेली नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. हा एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. तुला सोडणार नाही मी एवढं लक्षात ठेव”, असं क्षीरसागर म्हणाले आहेत.