राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही महत्त्वाकांक्षी योजना येत्या ऑक्टोबरपासून जिल्हय़ात राबवली जाण्याची शक्यता आहे. एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे दारिद्रय़रेषेखालील, केसरी, अंत्योदय अन्नपूर्णा योजेनेतील सुमारे ६० हजार शिधापत्रिकाधारक योजनेचे जिल्हय़ातील लाभार्थी असतील.
योजनेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कारभारी खरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निरटुरकर यांच्या उपस्थितीत जिल्हय़ातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची कार्यशाळा झाली. त्या वेळी योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. वसीम शेख यांनी ही माहिती दिली.
राज्य सरकारने यापूर्वी ही योजना गेल्या वर्षीपासून गडचिरोली, अमरावती, सोलापूर, धुळे, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड व रायगड या जिल्हय़ांत सुरू केली आहे. आता नगर जिल्हय़ात पुढील महिन्यापासून सुरू केली जात आहे. दारिद्रय़रेषेखालील, केसरी, अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेतील रेशनकार्ड धारकांना ‘हेल्थ कार्ड’ दिले जाणार आहे. त्याचे वितरण लवकरच घरोघर केले जाणार आहे.
योजनेंतर्गत राज्य सरकार या सर्व रेशन कार्डधारकांचा प्रत्येकी दीड लाख रुपयांचा विमा उतरवण्यात येणार आहे. त्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीशी करार करण्यात आला आहे व सुमारे २४ कोटी रुपयांचा प्रीमियम जमा करण्यात आला आहे. योजनेनुसार कार्डधारकास ९७२ प्रकारच्या आजारांवर सरकारी व काही ठराविक रुग्णालयात मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील. योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हय़ातील खासगी ५५ रुग्णालयांनी अर्ज केले आहेत. त्यांची निवड होणे बाकी आहे. आजच्या कार्यशाळेत योजनेची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे डॉ. शेख यांनी सांगितले.