देशातील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. केंद्राच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. “आतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दरांची तुलना केली तर कांदा निर्यात होणं शक्य नाही. अशात सरकारने हा निर्णय घेतला आहे. हे सरकार शेतकऱ्याला मातीत घालायला निघालं आहे,”अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.

पूराचा फटका आणि खरिपातील कांदा बाजारात न आल्याने देशभरात कांद्याचे दर वाढत चालले आहेत. राज्यातील अनेक भागात उद्भवलेल्या पूरपरिस्थिमुळे जूनमध्ये होणारी लागवड सप्टेंबरमध्ये करण्यात आली. या कांद्याची आवक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ऐन सणासुदीत कांद्याच्या किंमतीने वाढायला लागल्या होत्या. सध्या बाजारात कांद्याचे भाव ४५ ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पाकिस्तानातून कांदा आयात केल्यानंतरही कांद्याचे दर नियंत्रणात येत नसल्याने केंद्राने पाऊल उचलत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. कांद्याच्या निर्यातीचा निर्णय तात्काळ लागू करण्यात आल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले होते.

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय म्हणजे पोरखेळ असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. “केंद्राने निर्यातमूल्य वाढवलेलं आहे. त्यात पुन्हा कांदा निर्यात थांबवली आहे. महिना दीड महिन्यात खरिपाचा कांदा बाजारात येईल. तेव्हा शेतकऱ्यांना यांचा फटका बसणार आहे. आयात निर्यातीचं धोरण स्थिर असावं. ज्यामुळे शेतकऱ्यांना निर्यात करताना फायदा होईल, अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत. हा पोरखेळ सुरू आहे. ज्यावेळी शेतकरी रस्त्यावर फेकत होते. तेव्हा खरेदी करण्यात आली नाही. आता शेतकऱ्यांना दर कमी करण्यासाठी निर्यात बंदी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील काद्यांचे भाव आणि देशातील भाव बघितले तर कांदा निर्यात होणं शक्य नाही. अशा स्थितीत सरकारने हा निर्णय कसा घेतला. हे सरकार शेतकऱ्याला मातीत घालायला निघालं आहे,” असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.