साताऱ्याच्या सभेत भिजत भिजत बोलले त्या शब्दांची तुम्हाला आठवण…, राजू शेट्टींचा शरद पवारांवर हल्लाबोल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीचे तुकडे केल्यावरून केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीचे तुकडे केल्यावरून केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या साताऱ्याच्या पावसातील सभेची आठवण करून देत दिलेल्या शब्दांवरून निशाणा साधला. तसेच दसऱ्याला शेतकऱ्यांचा शिमगा करणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांचा दिवाळीला काळे झेंडे घेऊन स्वागत करा, असं शेतकऱ्यांना आवाहन केलंय. ते कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे भरलेल्या २० व्या ऊस परिषदेत बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले, “मराठवाडा, पश्चिम विदर्भात परतीच्या मान्सूनमध्ये प्रचंड हानी झाली. कापूस, भुईमुग, सोयाबीन, उडीद, मूग पाण्यात बुडाला. जिरायत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही त्यांची वर्षाची जगायची जिंदगी होती. ती सगळी पाण्यात वाहून गेली. त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. जर सरकारकडं खरोखर पैसे नव्हते, तर त्याच काळात सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना रोखीने ११ टक्के महागाई भत्ता कसा दिला? या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा केसानं गळा कापला.”

“दसऱ्याला आमचा शिमगा झाला, तर दिवाळीला तुमचा शिमगा केल्याशिवाय सोडणार नाही”

“शरद पवार साताऱ्याच्या सभेत भिजत भिजत बोलले की हे राज्य आम्ही शेतकऱ्यांसाठी बदलतो आहे. तुमचेच शब्द तुम्हाला आठवण करून द्यावे म्हणून मी ही आठवण केली. आम्ही सगळ्यांच्या दारात जाऊन आलो. दसऱ्याला जर आमचा शिमगा झाला, तर दिवाळीला तुमचा शिमगा केल्याशिवाय सोडणार नाही असा सरकारला इशारा दिला. आता सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

“दिवाळीला आघाडीच्या मंत्र्यांचं हातात काळे झेंडे घेऊन स्वागत करा”

“आता महाविकासआघाडीचे मंत्री दिवाळीला तुम्हाला गावात शुभेच्छा द्यायला येतील. तेव्हा हातात काळे झेंडे घेऊन त्यांचं स्वागत करा एवढीच विनंती आहे. खरंच तुम्हाला पूरग्रस्तांवर अन्याय झाला असं वाटत असेल तर यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका,” असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं.

राजू शेट्टी म्हणाले, “कोल्हापूरला मोर्चा काढला, ५ दिवस उन्हातान्हात चालत आलो. दोन पोरांनी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पाय सुजलेल्या अवस्थेत मुख्यमंत्र्यांच्या दारात गेलो. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली, तरी यांना पाझर फुटत नसेल तर आपण काय करायला पाहिजे.”

फडणवीसांचं ते पत्र म्हणजे अब्राहम लिंकनने हेडमास्तरांना लिहिलेल्या पत्रासारखं प्रसिद्ध नाही

“एफआरपीचे तुकडे करण्याची पायाभरणी केंद्र सरकारने केली. देवेंद्र फडणवीस जरी पत्राविषयी बोलत असले तरी ते काही अब्राहम लिंकनने हेडमास्टरांना लिहिलेल्या पत्रासारखं प्रसिद्ध पत्र नाही. मी राज्याच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयात, मुख्यमंत्री कार्यालयात, साखर आयुक्तांना केंद्राकडून पत्र आलंय का विचारलं. त्यांना कुणालाही एफआरपीचं पत्र आलेलं नाही, फक्त फडणवीसांनाच आलंय,” असं म्हणत त्यांनी मोदी आणि फडणवीसांवर हल्ला चढवला.

हेही वाचा : राजू शेट्टींच्या आंदोलनाची सरकारकडून दखल!; पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर उद्या मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक

“खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनीच निती आयोगाकडे एफआरपीचे तुकडे करण्याची मागणी केली होती,” असंही त्यांनी नमूद केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raju shetti criticize sharad pawar mva and modi government on sugar cane frp pbs

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या