राजू शेट्टी यांच्यापुढे आव्हान

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

शेतीचा कस कायम राखण्यासाठी पीकपालट पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे, यासारखे मार्गदर्शन सातत्याने शेतकऱ्यांना देऊ न प्रबोधनाचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले. मात्र राज्यातील ही प्रभावी शेतकरी संघटना आणि पक्षाला आपल्याच चळवळ आणि पक्षीय शिवारात पीकपालट करण्याचाच विसर पडला. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धक्कादायक निर्णय घेत गाव ते राज्यपातळीपर्यंतची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पक्ष व संघटनेची सर्व पदे बरखास्त केली असल्याची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. सतत संघर्षरत असलेल्या या संघटनेचा आणि पक्षाचा नवा चेहरा-मोहरा आणि कामाची पद्धत कशी असेल आणि शेट्टी यांच्याकडे कोणतेही लोकप्रतिनिधी पद नसताना गावगाडय़ापासून ते केंद्रापर्यंत विस्तारणारी कार्यकर्त्यांची नव्या उमेदीची फळी किती जोमदार असेल, यासारखे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

राज्यातील शेतकरी संघटनेला शरद जोशी यांनी चेहरा आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या मुशीत अनेक तरुण रक्ताचे कार्यकर्ते तयार झाले. त्यातील एक नाव राजू शेट्टी. कृष्णाकाठी शिरोळ तालुक्यात शेतकरी संघटनेची चळवळ त्यांनी बुलंद केली. पुढे वैचारिक मतभेद झाल्यावर शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावाने आपला नवा संसार थाटला. दूध-उसासारखे मुबलक शेती उत्पादन असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात या घटकासाठी आक्रमक आंदोलन करीत शेट्टींनी स्वाभिमानीचे या भागात चांगलेच बस्तान बसवले. शेतकरी संघटनेची चळवळ चालवत असताना दुसरीकडे पक्षीय राजकारण सुरू ठेवले. जिल्हा परिषद ते लोकसभा व्हाया विधानसभा अशा मार्गाने स्वत: राजकीय शिडय़ा चढत गेले. येथेच उणिवांची पेरणी होत राहिली. चळवळ- राजकारण यात गुंतलेल्या शेट्टींना चळवळ- पक्ष याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. अलीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अपयश आल्याने स्वाभिमानीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. याचा सारासार विचार करून स्वाभिमानीची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय सोलापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात शेट्टी यांनी घेतला.

सुंदोपसुंदीचे तण

चळवळ- पक्ष चालवायचा तर त्याची बांधणी होणे अनिवार्य असते. स्वाभिमानीत शेट्टी हे सर्वेसर्वा होते. त्यांच्या व्यग्रतेमुळे कार्यक्रमात संघटनेची बांधणी, नियमन, संचालन याकडे अंमळ दुर्लक्ष झाले. परिणामी गाव, तालुका, जिल्हा ते अगदी राज्यपातळीवर अनागोंदी सुरू झाली. एकेका गावात दोन-तीन गट पडले. प्रत्येक गट आपणच अधिकृत असल्याचा दावा करू लागला. वेगवेगळ्या पातळ्यांवर कोणाच्याही आणि कोणीही पदांच्या निवडी जाहीर करू लागला. जुना-नवा असा वाद कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात सुरू राहिला. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ नावाचा बिल्ला छातीवर लावून फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे त्यांच्यातील सुसंवाद संपून विसंवाद वाढला. संघटना बांधणीच्या मूळ तत्त्वांना खो घालणाऱ्या या अपवृत्तीला लगाम घालणारे कोणी उरले नाही. तसा धाकही कोणी दाखवेना. काही पदाधिकारी वर्षांनुवर्षे खुर्च्याना चिकटून राहिले. शेट्टींच्या कोल्हापूर जिल्ह्य़ात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष भगवान काटे स्थापनेपासून तर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील २००४ पासून त्याच पदावर राहिले. त्यांनी नव्या लोकांना संधी द्यावी, असे सूचित करूनही बदल झाले नाहीत.

स्वाभिमानीच्या मळ्यात नियमित फेरपालट

उसाच्या पट्टय़ात वाढलेल्या स्वाभिमानीमध्येही या भागाप्रमाणे ‘ऊ स एके ऊ स’ याप्रमाणे एकच पीक घेतल्याने जमीन नापीक झाली. यापुढे दर दोन वर्षांनी पदाधिकारी बदलले जाणार आहेत. गाव पातळीवरील सक्षम कार्यकर्ता तालुका, तालुक्याचा जिल्हा, जिल्ह्य़ाच्या राज्य आणि राज्याचा केंद्रीय किसान समितीत सामावून घेतला जाणार आहे. खेरीज, महिला, युवती, विद्यार्थी या सेलमध्येही बदल होणार आहेत. विभागीय, राज्य पातळीवर शिस्तपालन समिती संघटना- पक्षबांधणीकडे गंभीरपणे लक्ष ठेवणार असल्याने स्वाभिमानीचे नवे रूप शिस्तबद्ध आणि तितकेच आR मक राहील, असे राजू शेट्टी यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले. शेट्टी यांचा आशावाद भक्कम असला तरी या ना त्या कारणांनी पाठ फिरवलेल्यांना पुन्हा चळवळीशी जोडून घेणे हे मात्र आव्हानात्मक असणार आहे.