पुंजीपतीकडून धनशक्तीचा मुबलक वापर केला जात असताना पदरचे पैसे तर राहोत उलट मतदारांकडून पशासह मतांची बेगमी करीत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीला वेगळाच आयाम दिला आहे. आघाडी व महायुतीच्या उमेदवारांकडून निवडणुकीत पशाचा वारेमाप वापर केला जात असताना लोकांच्या मदतनिधी आधारे निवडणूक जिंकता येते याचा वस्तुपाठही शेट्टींनी घालून दिला आहे. मोदी लाटेवर स्वार होऊन शेट्टी यांनी सहकारातील मातब्बर नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पराभूत करून आपल्या राजकीय ताकदीची जाणीव या निमित्ताने करून दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपली राजकीय दुखरी नस असलेल्या शेट्टींना नेस्तनाबूत करण्यासाठी जंगजंग पछाडले. पण शेट्टींनी विजयाचा वर्मी घाव घालत पवारांची डोकेदु:खी आणखी वाढवून ठेवली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील या वेळची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निर्माण केलेल्या आव्हानाचे काय होणार? याकडे देशभरातील जाणकारांच्या नजरा लागल्या होत्या. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष असलेले कल्लाप्पाण्णा आवाडे हे जैनधर्मीय नेते आघाडीकडून िरगणात उतरल्याने शेट्टी यांची पंचायत झाली होती. इथेच जैन धर्मातील मतांची फूट होण्याचा धोकाही शेट्टी यांना जाणवत होता. प्रत्यक्षात जैनधर्मीयांसह ऊस उत्पादक शेतकरी, सामान्य जनता यांनी शेट्टी यांची पाठराखण केली. उलट पदरमोड करीत बळीराजाने आपल्या कृतीने शेट्टींना आम्ही शिवार राखतो, तुम्ही संसद सांभाळा असा संदेश दिला. या ताकदीच्या आधारे शेट्टी यांनी आपल्यासमोरील आव्हान परतवून लावत गतवेळेपेक्षा जवळपास दुप्पट म्हणजे १ लाख ७७ हजाराचे भरभक्कम मताधिक्य कमावले. गेल्या दशकभरात शेट्टी यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिमा विस्तारत चालली आहे. इतकी की दोन वर्षांपूर्वी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या बारामती या बालेकिल्ल्यात जाऊन ललकारी दिली होती. तेव्हा पण पवारांचा तिळपापड झाला होता. खेरीज, शेट्टी ज्याप्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण मांडून साखरसम्राटांच्या गरव्यवहारावर हल्लाबोल करीत होते.