शहरालगतची १७ गावे तसेच शिरोली व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील नागरिक, उद्योजकांनी महापालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावास जोरदार विरोध दर्शवित जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी भर पावसात महामोर्चा काढला. शहराच्या हद्दवाढीविरोधात आवाज बुलंद करीत हद्दवाढविरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सतरा गावांतील ग्रामस्थ मोर्चामध्ये शेळ्या-मेंढया, बलगाडय़ा, म्हशींसह ट्रॅक्टर, बलांसह सहभागी झाले होते. याप्रश्नी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुचित मिणचेकर, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याशी चर्चा केली.
हद्दवाढीविरोधात गेल्या पंधरवडय़ापासून ग्रामीण भागातील नागरिक व उद्योजकांनी आंदोलन सुरू केले आहे. बहुतेक सर्व गावांमध्ये हद्दवाढ रोखली जावी या मागणीसाठी गाव बंद करण्यात आले होते. आंदोलनाचे पुढील पाऊल म्हणून सोमवारी सामूहिकरीत्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.
गांधी मदानातून या मोर्चाला सुरुवात झाली. हद्दवाढीमुळे बाधित गावांमध्ये शासनाच्या भूमिकेमुळे प्रचंड चीड निर्माण झाल्याचे यावेळी दिसून आले. महानगरपालिका सध्या शहरात स्थानिक लोकांना पुरेशा सोयी सुविधा देत नाही, मग हद्दवाढ झाल्यानंतर इतर गावांना कशा सुविधा पुरविणार असा प्रश्न उपस्थित करत हद्दवाढीमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांनी हद्दवाढीला विरोध केला आहे. माळकर तिकटी परिसरात मोर्चा पोलिसांनी अडवल्याने तेथे शंखध्वनी आंदोलन करण्यात आले.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर तेथे सभा झाली. आमदार नरके म्हणाले, हद्दवाढीबाबत न्यायालयीन लढाई लढायची वेळ आली तर मागे पडणार नाही. पण महापालिकेला एक इंचही हद्दवाढ करू देणार नाही. आमदार  मिणचेकर म्हणाले, या १७ गावांतील ग्रामस्थ आपल्या जमिनी महापालिकेकडे हस्तांतरित करू इच्छित नाहीत. महापालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावात दोन्ही औद्योगिक वसाहतीचाही समावेश आहे. ही गोष्ट त्या गावातील लोकांवर अन्यायकारक आहे. माजी आमदार पवार म्हणाले, महापालिकेने  अकृषक भाग म्हणून हद्दवाढ प्रस्ताव दिला असून तो अन्यायकारक आहे. मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सुनील माने, आपचे नाथाजी पोवार, सुरेश सूर्यवंशी, बी.ए.पाटील वाशीकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, प्रा.बी.जी.मांगले, प्रताप कोंडेकर, अनिल ढवन आदींसह कार्यकत्रे, ग्रामस्थ सहभागी झाले होते.