कर्जत : कर्जत तालुक्यातील सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यावसायिक प्रक्रिया संघ मर्यादित या सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. सभापती प्रा. शिंदे यांचे समर्थक १५ संचालक त्यावर निवडले गेले. या सहकारी संस्थेवर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचेच वर्चस्व राहिले. हा सहकारी दूध संघ यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षाच्याच ताब्यात होता.

सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यावसायिक प्रक्रिया संघाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण १५ जागांसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामुळे निवडणूक अधिकारी यांनी सर्व संचालक बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. दूध संघाचे नवनिर्वाचित संचालक पुढील प्रमाणे : मंगेश जगताप, काकासाहेब धांडे, दादासाहेब खराडे, शामराव काळे, बाळासाहेब निंबाळकर, अंकुशराव दळवी, रामजी पाटील, दत्तात्रय पाटील, शंकरराव देशमुख, दत्तात्रय तनपुरे, दादासाहेब निंबाळकर, शिवाजी काळे, बारकू काळे, शशिकला हनुमंत शेळके व छाया दीपक ढगे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी संचालकांसह भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष अनिल गदादे व माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, संपत बावडकर, विनोद दळवी उपस्थित होते. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, दूध संघाचा कारभार लोकाभिमुख करा व सहकाराच्या तत्त्वाप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन संघाची प्रगती करा, असे आवाहन नव्या संचालकांना केले. तसेच दूध संघाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.