अहिल्यानगर : सरकारी सेवेमध्ये शिक्षक ही सर्वांत पवित्र सेवा आहे. त्यामुळे शिक्षकांनी विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी ज्ञानदानातून सक्षम पिढी घडवावी. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात जिल्हा राज्यात अव्वल राहण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२२, २०२३ व २०२४ या वर्षातील जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी सभापती शिंदे बोलत होते. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते.

शिक्षण हे केवळ करिअर घडवण्याचे साधन नसून, जीवन जगण्याची दिशा देणारी प्रक्रिया आहे. नव्या शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांनीही आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही, तर गावात सामाजिक क्रांतीही घडवू शकतात, असे सभापती शिंदे म्हणाले.

या वेळी सीईओ भंडारी यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या मिशन आपुलकी, मिशन आरंभ या उपक्रमांची माहिती देताना प्राथमिक शाळांची गुणवत्ता उंचावत असल्याचे सांगितले. आमदार दाते, आमदार पाचपुते, जिल्हाधिकारी आशिया आदींचे भाषण झाले. पुरस्कार विजेत्यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील (प्राथमिक) व संध्या गायकवाड (माध्यमिक) यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

बदल्यांचा नवा ‘फॉर्म्युला’ करा-विखे

पालकमंत्री विखे म्हणाले, की शिक्षक हा युवा पिढीला दिशा देणारा असल्याने तो राज्याच्या निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. समाजातून शिक्षक वजा केला, तर राष्ट्र व समाजाची प्रगती होऊ शकत नाही. परंतु आता समाजमाध्यमाचा परिणाम शिक्षणावर होत असल्याने शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे. शिक्षणाच्या आधारावरच देश उभारी घेत असल्यामुळे अमेरिका भारतावर निर्बंध घालत आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ भंडारी यांनी बदल्यांच्या धोरणात लक्ष घालून नवा ‘फॉर्म्युला’ तयार करावा. कारण गैरसोय झाल्यामुळे अनेक शिक्षक आम्हाला भेटतात. शिक्षकांवर अनेक प्रकारच्या प्रशासकीय कामांची जबाबदारी टाकली जाते, परंतु त्यामागे सरकारचा शिक्षकांवर असलेला विश्वास हेच प्रमुख कारण आहे.