भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणा-या उमेदवारांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे आणि सोलापूरमधील उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून पुणे शहर कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महापालिकेत भाजप आणि आरपीआयची युती झाली असली तरी राज्यातील उर्वरित ९ महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रिपाइं स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. आरपीआयने भाजपकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाजपने त्यावर निर्णय न घेता परस्पर आरपीआयच्या उमेदावारांना कमळ चिन्ह दिले होते.

मुंबईवगळता अन्य भागांमध्ये रिपाइं स्वबळावर लढणार आहे. मित्र पक्ष भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हावर पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवू नये, तसे केल्यास पक्षातून निलंबित करण्याचा ठराव रिपाइंच्या लोणावळ्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वसंमतीने करण्यात आला. यानुसार सोलापूर आणि पुण्यात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणा-या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाची पुणे शहर जिल्हा कार्यकारिणी बर्खास्त करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे राज्यातील सरचिटणीस राजा सरवदे यांनी केली आहे. पुण्यात रिपाइंच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-रिपाइं युतीची घोषणा करण्यात आली. रिपाइंला २५ जागा व सत्ता मिळाल्यास उपमहापौर पद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. उल्हासनगरमध्ये रिपाइंने भाजपशी काडीमोडी घेत शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये रिपब्लिकन पक्षाला सोडलेल्या जागांवर भाजपच्या उमेदावारांनी अर्ज भरले आहेत. काही जागांवर भाजपने कमळ चिन्ह देऊन रिपाइंच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या सर्व प्रकारामुळे रिपाइंचे नेते नाराज झाले आहेत.

पुणे महापालिकेतील निलंबित केलेले उमेदवार

डॉ. सिद्धार्थ धेंडे, फरजाना शेख, वैभव पवार, सोनाली लांडगे, सुनीता वाडेकर, रीना आल्हाट, विशाल शेवाळे, नवनाथ कांबळे, यादव हरणे, सत्यभामा साठे यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील तीन उमेदवारांनाही निलंबित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale rpi suspended candidate contesting election on bjp symbol
First published on: 08-02-2017 at 17:40 IST