शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आंबडेकरांच्या या सल्ल्यानंतर यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब (प्रकाश आंबेडकर) कधी कधी चांगला सल्ला देतात. या सल्ल्यावर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या सल्ल्याला माझाही पाठिंबा आहे असं आठवले म्हणाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, हा प्रकाश आंबेडकरांचा चांगला सल्ला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दोस्ती होती. ही दोस्ती आता आहे की नाही ते माहिती नाही. परंतु त्यांनी दिलेला सल्ला उद्धव ठाकरे यांनी मान्य करायला हरकत नाही. परंतु उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा सल्ला ऐकतात की शरद पवारांचा ते लवकरच कळेल. मात्र प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला योग्य आहे, या सल्ल्याला माझाही पाठिंबा आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईच्या भांडुपमध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे. “महाविकास आघाडीच्या नादी लागू नका”, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हे ही वाचा >> करोनापेक्षा भयंकर रोग येतोय? ‘डिसीज एक्स’बद्दल WHO च्या इशाऱ्याने टेन्शन वाढवलं प्रकाश आंबेडकर यांनी योग्य सल्ला दिला आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचं ऐकावं असं आठवले यांनी म्हटलं आहे.