Ramdas Kadam on Savli Bar in kandivali : “गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असून या डान्सबारवर अलीकडेच पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या डान्सबारमधील २२ बारबालांवर कारवाई देखील केली आहे”, अशी माहिती देत शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परब यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, योगेश कदम यांचे वडील व माजी मंत्री रामदास कदम यांनी कबूल केलं आहे की कांदिवलीत पोलिसांनी कारवाई केलेला बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे.
रामदास कदम म्हणाले, “अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि या अर्धवट वकिलाच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे चालतात, त्यामुळेच त्यांची अशी अवस्था झाली आहे. आमचा तो बार गेल्या ३० वर्षांपासून एक शेट्टी नावाचा इसम चालवतो आहे. हे वास्तव आहे की त्या हॉटेल आणि बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावाने आहे. तसेच तिच्या नावाने ऑर्केस्ट्राचा परवाना देखील आहे. मुलींचं वेटरचं लायसन्स देखील आमच्याकडे आहे. परंतु, ते काही अनधिकृत नाही. तिथे अनधिकृतपणे डान्स चालत नाही.”
अशा प्रकरणांमध्ये मालकाला जबाबदार धरता येत नाही : रामदास कदम
शिवसेनेचे (शिंदे) नेते म्हणाले, “त्या बारमध्ये एक गोष्ट घडली की एका ग्राहकाने तिथल्या मुलीवर पैसे उधळले होते. त्यानंतर पोलीस तिथे गेले. मला ती गोष्ट समजल्यानंतर मी तात्काळ ऑर्केस्ट्रा व मुलींचं लायसन्स पोलिसांना सुपूर्द केलं आणि हॉटेल बंद केलं. कारण अशा घाणेरड्या पैशांची मला आवश्यकता नाही. ते अर्धवट वकील पुरेशी माहिती देत नाहीत. त्यांना कायदा माहित नाही. बार मालकाची केवळ दारूबाबत जबाबदारी असते. मात्र, डान्स व इतर गोष्टींसंदर्भात मालकाला जबाबदार धरता येत नाही.”
रामदास कदम अब्रूनुकसानीचा दावा करणार?
“डान्सबार व हॉटेल संदर्भातील कलमात म्हटले की करार करून एखाद्या इसमाला हॉटेल व बार चालवायला दिल्यानंतर तिथे घडणाऱ्या सर्व गोष्टींसाठी तो इसम जबाबदार असेल. मालक जबाबदार नसतो, असा नियम आहे. परंतु त्या अर्धवट वकिलांना या नियमाची माहितीच नाही. अनिल परब केवळ मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मी देखील आता वकिलांचा सल्ला घेऊन अनिल परब यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करता येतोय का? याची चाचपणी करत आहे.”
विधानसभा अध्यक्षांकडे अनिल परबांवर कारवाई करण्याची मागणी करणार : कदम
“या लोकांनी (विरोधक) दापोलीमध्ये मला, योगेश कदमला संपवण्याचा प्रयत्न केला. योगेश कदमला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला. आता विधिमंडळात चुकीची माहिती देऊन, चुकीची कलमं सांगून, चुकीचे नियम सांगून पुन्हा एकदा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा पद्धतीने अनिल परब हे विधिमंडळाचा गैरफायदा करत असतील तर मी विधिमंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे आणि अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कदम म्हणाले, “विधिमंडळात चुकीची कलम सांगणे, योगेश कदम यांचा राजीनामा मागणे, हा काय खाऊ आहे का? त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी केवळ रामदास कदम दिसत आहेत. परंतु, मला त्यांना सांगायचं आहे की तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कारण मी कधीच नियमाबाहेर जाऊन कुठलंही काम केलेलं नाही.”