सहा तारखेला बारसूला जाऊन लोकांना भेटून बोलणार. कसं मला अडवू शकता, तो पाकव्याप्त काश्मीर किंवा बांग्लादेश नाही. माझ्या रत्नागिरीतील तो भाग आहे. सहा तारखेला आधी मी बारसूला आणि नंतर महाडच्या सभेला जाणार, अशी घोषणा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. यावरून शिवसेना ( शिंदे गट ) नेते, रामदास कदम यांचा समाचार घेतला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
रामदास कदम म्हणाले, “सर्वांना विश्वासात घेऊनच महाराष्ट्राचा गाडा पुढं घेऊन जायचा आहे. विरोधी पक्ष म्हणजे आपला दुश्मन आहे, ही उद्धव ठाकरेंची पॉलिसी आहे. कारण, ते सुडाचं राजकारण करत आहेत. उद्धव ठाकरेंनीच बारसूचं नाव सुचवलं आणि तेच ६ तारखेला तिकडं जात आहेत. काय चौपाटी आहे का ती?.”
हेही वाचा : शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण…”
“उद्धव ठाकरे दुतोंडी गांडूळ आहेत. बारसूला प्रकल्प करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र लिहिलं. ही वेळ उद्धव ठाकरेंनीच आणली. याच्यापाठीमागे ठाकरेंचं कटकारस्थान आहे. बारसूतील वातावरण चिघळवायचं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी लायक नाहीत, हे दाखवण्यासाठी सूडाचं काम उद्धव ठाकरे दुतोंडी सापासारखं करत आहेत,” अशी टीका रामदास कदम यांनी केली.
“उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. तेच बारसूत लोकांना भडकवण्यासाठी येत आहेत. पण, लोक उद्धव ठाकरेंच्या तोंडावर थुंकतील,” असं टीकास्र रामदास कदम यांनी सोडलं आहे.
हेही वाचा : शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर बहीण सरोज पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून गुळाचा गणपती बसवला. स्वत: सहकार चालवत ५७ टक्के निधी राष्ट्रवादीने घेतला. अजित पवारांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेशी बेईमानी केली. त्यामुळेच ४० आमदारांना बाहेर पडावं लागलं. माझ्या मुलाला निधी न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना १० कोटी रुपयांचा निधी दिला,” असेही रामदास कदमांनी म्हटलं.