भास्कर जाधवांच्या नियुक्तीमुळे रामदास कदम सक्रिय

मागील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय विजनवासात गेलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम कोकणच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री भास्कर जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना मंत्रीपद मिळाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्य़ातील शिवसेनेचे वर्चस्व टिकवण्यासाठी कदम सक्रिय झाल्याचे मानण्यात येत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय विजनवासात गेलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम कोकणच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री भास्कर जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना मंत्रीपद मिळाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्य़ातील शिवसेनेचे वर्चस्व टिकवण्यासाठी कदम सक्रिय झाल्याचे मानण्यात येत आहे.  जिल्ह्य़ातील गुहागर मतदार संघ भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानला जात असे. कै.डॉ. तात्यासाहेब नातू आणि डॉ. विनय नातू या पिता-पुत्रांनी सुमारे २० वष्रे सातत्याने हा मतदारसंघ भाजपकडे राखला होता. पण मागील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपामध्ये तो सेनेला देण्यात येऊन तेथून कदम यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे डॉ.नातू यांनी बंडखोरी केली. त्यामुळे झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले आणि कदम तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यानंतर काही निवडक प्रसंगवगळता ते राजकीय विजनवासात गेल्याचे चित्र होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्य़ात चांगल्या प्रकारे जम बसवत शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले. त्यातच जाधव आणि सामंत यांना पक्षाने वेगवेगळ्या प्रकारे बढती देऊन आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या घडामोडींची नोंद घेत शिवसेनेच्या श्रेष्ठींनी कदम यांचा रुसवा काढत त्यांना जिल्ह्य़ामध्ये पुन्हा सक्रिय होण्यासाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.   रत्नागिरी जिल्हा परिषद आणि राजापूर, रत्नागिरी नगर परिषद तसेच दापोली व देवरुख नगर पंचायतीवर भाजप-सेना युतीची सत्ता असून चिपळूण नगर परिषद व गुहागर नगर पंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर दापोली, चिपळूण आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. ही सत्तास्थाने कायम ठेवून लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस आघाडीला जोरदार टक्कर देण्यासाठी कदम पुन्हा रिंगणात उतरल्याचे मानले जाते. त्यांच्या उपस्थितीत काल चिपळूण येथे जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यामध्ये कदम यांनी येत्या दिवाळीनंतर जिल्ह्य़ात युतीच्या प्रचाराचा धुमधडाका उडवून देण्याचा निर्धार जाहीर केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ramdas kadam become active with oppointment of ramdas kadam

ताज्या बातम्या