रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. येथील स्थानिक लोकांनी रिफायनरीला विरोध केला असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ६ तारखेला बारसू दौऱ्यावर जाणार आहेत. ते बारसूतील शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीकास्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे हे सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम करत आहेत. ते दुतोंडी सापाची भूमिका बजावत आहेत, अशा शब्दांत रामदास कदमांनी टीका केली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा- “दोन दिवसांनंतर तुम्हाला…”, राजीनामा मागे घेण्याच्या मागणीवर शरद पवारांचं सूचक विधान; कार्यकर्त्यांना केलं आश्वस्त!

यावेळी रामदास कदम म्हणाले, “माझं याबाबत स्पष्ट मत असं आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना स्वत: बारसूची जागा सुचवली होती. तसं त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिलं होतं. मग मुख्यमंत्री असताना एक भूमिका आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर दुसरी भूमिका, असं का? कोकणात पाऊस आल्यानंतर सरडा जसा रंग बदलतो, तसं सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत का? आमच्या कोकणात दुतोंडी गांडूळ असतो, मग उद्धव ठाकरे दुतोंडी सापाची भूमिका बजावतायत का?”

हेही वाचा- “शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले आणि अजित पवारांना…”, राजीनामानाट्यावर रामदास कदमांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंना उद्देशून रामदास कदम पुढे म्हणाले, “जी गोष्ट तुम्हीच सुचवली… जो प्रस्ताव तुम्हीच आणला… त्यावेळी तुम्ही तेथील जनतेशी संवाद साधून हा निर्णय का घेतला नाही? हाही प्रश्न आहे. त्यामुळे हेतुपुरस्कर बारसूमध्ये लाठीचार्ज व्हावा, गोळीबार व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, एवढं करण्यासाठीच हा माणूस (उद्धव ठाकरे) इकडे येतोय.”