करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट दसरा मेळावा घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. उपस्थितीच्या मर्यादेमुळे हा दसरा मेळावा शुक्रवारी शिवाजी पार्कऐवजी षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते रामदास कदम हे दसऱ्या मेळाव्याला हजर राहणार नाहीत. यासंदर्भात रामदास कदम यांनी एक पत्र लिहून प्रकृती ठीक नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्याना माहिती दिली आहे. 

अनिल परब यांच्याबाबत रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर कदम वादात सापडले होते. रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली बाजू देखील मांडली होती. तीन महिन्यापासून प्रकृती ठीक नाही, गर्दीच्या ठिकाणी जाण्यास डॉक्टरांनी मनाई केल्याचे कदम यांनी सांगितले आहे. 

माझ्याविरुद्ध कारस्थान -रामदास कदम

माझ्या मंत्रिपदाच्या काळात कोकणातील पर्यटन उद्योग वाढावा यासाठी सीआरझेडमध्ये शिथिलता मिळवण्यासाठी मी प्रयत्न केला होता. दापोली तालुकाच नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टीत स्थानिकांना पर्यटनाद्वारे रोजगार मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत राहणार आहे. मंत्री अनिल परब यांच्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबत बोलणे उचित नाही. पण येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी हे रचलेले कारस्थान आहे, असा खुलासा रामदास कदम यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

अनिल परब यांच्याबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त क्लिपवर रामदास कदम यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधतील संवाद

मुंबई महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना योग्य तो राजकीय संदेश देऊन निवडणुकीच्या कामासाठी त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यातील संवादाची संधी साधतील. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणात पुढील राजकीय दिशा आणि विरोधकांचा समाचार असेलच पण त्याचबरोबर शिवसेनेने मुंबईच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील.