Ramesh Chennithala on BMC Election 2025 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) एकत्र येणार असल्याची चर्चा रंगत असतानाच काँग्रेसने सध्या तरी स्वबळाची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोमवारी (३० जून) सायंकाळी नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार का असा प्रश्न विचारला. त्यावर चेन्नीथला म्हणाले, “येत्या ७ जुलै रोजी काँग्रेसची राजकीय व्यवहार समिती निर्णय घेईल.”

दरम्यान, चेन्नीथला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बरोबर घेण्याबाबतही भाष्य केलं आहे. “राज ठाकरे यांची उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय अशी भूमिका आम्हाला मान्य नसून भारत हा एक आहे”, असं चेन्नीथला यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणार की एकत्र निवडणूक लढणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

राज ठाकरेंना बरोबर घेणार का? चेन्नीथला म्हणाले…

राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत बरोबर घेणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर रमेश चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. उत्तर भारत व दक्षिण भारत वेगळा नाही. भारत हा एकच आहे. काँग्रेसने उत्तर भारताला मजबूत केलं आहे. तिथे अधिक संधी दिल्या गेल्या आहेत. आम्ही आमची विचारधारा घेऊन पुढे जाणार आहोत. राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर आम्ही विचार करू. आत्ता काही ठरलेलं नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस महाविकास आघाडीत निवडणूक लढणार की स्वबळाचा नारा?

दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चेन्नीथला यांना विचारलं की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल? यावर चेन्नीथला म्हणाले, “आत्ता तरी याबाबत काही निर्णय झालेला नाही. येत्या ७ जून रोजी आमच्या राजकीय व्यवहार समितीची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपले अधिकाधिक उमेदवार असावेत. मुळात ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. स्थानिक स्तरावर ही महत्त्वाची निवडणूक असते. समितीचे अध्यक्ष याबाबत सर्व नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतील.