‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट फेम पिट्या भाई अर्थात अभिनेते रमेश परदेशी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची साथ सोडत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. दरम्यान राज ठाकरेंनी जे मला सुनावलं त्याचा राग आला नाही पण धक्का बसला असंही आता रमेश परदेशी यांनी म्हटलं आहे.

रमेश परदेशी यांचं भाजपात प्रवेश करण्याचं कारण काय?

भाजपात प्रवेश करण्याचं कारण हेच आहे की मी आधी मनसेच्या माध्यमातून १८ ते २० वर्षे काम करतो आहे. मराठी कलाकार, मराठी सिनेमा यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. ही मदत व्यापक स्वरुपात केली गेली पाहिजे या उद्देशाने मी भाजपात आलो. जे सत्तेत असतात त्यांचा प्रभाव पडतोच त्यामुळे मी भाजपात आलो.

राज ठाकरेंनी मला सुनावलं याचा धक्का बसला-रमेश परदेशी

राज ठाकरेंनी मला सुनावलं तर तो त्यांचा अधिकार आहे. संघाच्या गणवेशातला फोटो होता, कट्टर स्वयंसेवक आहे त्यावरुन त्यांनी मला काही म्हटल्याचं आठवत नाही. माझी पोस्ट इतकीच होती की संघशक्ती युगेयुगे. ही घटना इतकीच होती. मी संघाचा स्वयंसेवक आहे, कारसेवक आहे हे काही लपून राहिलेलं नाही. कुठल्या अनुषंगाने ते तिथं आले आणि राज ठाकरे मला बोलले ते माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं. मला त्याचा राग आला नाही पण धक्का बसला. राज ठाकरेंना कुणी सांगितलं किंवा त्यांनी हे का सांगितलं असेल ना तो १०० टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंचा शत्रू आहे. त्या दिवशी मला राज ठाकरेंनी आदेश दिला की इकडे राहा किंवा तिकडे. मग मी माझ्या विचारांसह राहतो. मी माझ्या विचारांसह राहतो. राज ठाकरे हे आपलं पहिलं प्रेम आहे. राज ठाकरेंवर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. त्यामध्ये मी पण असणारच आहे. त्यात पक्ष हा काही विषय येत नाही. असं रमेश परदेशी यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

रमेश परदेशी पक्ष प्रवेशानंतर काय म्हणाले?

“सगळ्यांना जय महाराष्ट्र! मी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. परंतू महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंसह मागची २० वर्षे काम करत होतो. आत्ता बदलेली राजकीय स्थिती पाहता कलाकारांना, मराठी चित्रपटांना न्याय देण्यासाठी आणि माझ्यावर असलेले संघाचे संस्कार हे मला खुणावत होते. त्यामुळे मी जाहीर रित्या भाजपात प्रवेश केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखरपणे देश चालवत आहेत. त्याच प्रमाणे मराठी कलाकार, मराठी चित्रपटांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्याचं काम मी राज्य सरकारच्या मदतीने करेन. संघात जसं मानलं जातं की राष्ट्र प्रथम याच तत्त्वावर विश्वास ठेवून मी भाजपात प्रवेश केला आहे.”